सामाजिक स्वास्थ्यासाठी विधवा पुनर्विवाहाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:33 AM2021-01-25T04:33:36+5:302021-01-25T04:33:36+5:30
बीड : गुरुनिष्ठ संत, पंढरीचे निस्सीम वारकरी श्री संत खंडोजीबाबा यांच्या चरणांजवळ आलात की देव भेटेल, असे प्रतिपादन ह. ...
बीड : गुरुनिष्ठ संत, पंढरीचे निस्सीम वारकरी श्री संत खंडोजीबाबा यांच्या चरणांजवळ आलात की देव भेटेल, असे प्रतिपादन ह. भ. प. प्रा. नाना महाराज कदम यांनी केले. श्रीक्षेत्र लोणी वारणी येथे संत खंडोजी बाबा पुण्यतिथी सोहळ्यात चौथे कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती महंत यादव बाबा, अभिमान महाराज ढाकणे, संजय महाराज देवकर, प्रा. सुरेश महाराज जाधव, योगेश महाराज जोगदंड, खंडोजी महाराज यांची होती.
यावेळी कदम महाराज म्हणाले, संत बंकट स्वामी महाराज यांचे शिष्य संत वामन भाऊ, संत भगवान बाबा यांनी महाराष्ट्रात प्रचार-प्रसाराचे खूप मोठे काम करीत जनसामान्यापर्यंत वारकरी संप्रदाय नेला. वैराग्याच्या जोरावरच देवत्व आपलेसे करण्याचे सामर्थ्य संतांमध्ये असते. खरा परमार्थ करताना आजच्या आधुनिक युगामध्ये संतांचे विचार जीवनामध्ये अंगिकारणे महत्त्वाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाने सर्वप्रथम विधवा महिलांनाही सांप्रदायात महत्त्वाचे स्थान दिले. सद्य:स्थितीत लोकांनी तरुण वयामध्ये अकाली वैधव्य आलेल्या महिलांचे पुनर्विवाह करण्याचा विचारही करावा. सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी विधवा विवाहाची संकल्पना पुन्हा एकदा समाजामध्ये रूढ होणे गरजेचे असल्याचे नाना महाराज म्हणाले. या कीर्तनात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. खंडोजी बाबा गडावरील टाळकरी, गायक-वादक सर्वांची साथसंगत लागल्याने कीर्तनात रंगत आली.