दुर्लक्षित चालुक्य कालीन ठेवा कात टाकणार; केसापुरीतील पुरातन मंदिराचे होणार पुनर्निर्माण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 02:01 PM2023-05-23T14:01:12+5:302023-05-23T14:02:29+5:30
माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे हा स्थापत्य केलेचा उत्कृष्ट ठेवा दुर्लक्षित झाल्याने मोडकळीस आला आहे.
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव : चालुक्य काळात बांधण्यात आलेल्या मंदिराची पुरातत्व विभागाकडून शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या मंदिराचे पुनर्निर्माणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार असुन येत्या दोन वर्षात हे मंदिर पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे.
माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे हा स्थापत्य केलेचा उत्कृष्ट ठेवा दुर्लक्षित झाल्याने मोडकळीस आला आहे. या वास्तू शिल्पाचे जतन व्हावे यासाठी गावकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून यावर आवाज उठवला होता. त्यानुसार, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, सेवानिवृत्त असलेले जतन समितीचे बालाजी बनसोडे, अभियंता नितीन चारुडे, वास्तू विशारद योगेश कासार आणि आकाश कराड यांनी या ठिकाणी पाहणी केली. या वास्तू शिल्पाचे पुनर्निर्माण करण्याचे ठरवत प्रत्यक्ष कामास सुरवात केली. येत्या दोन वर्षात या स्थापत्य शिल्पास गत वैभव मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले.
सदरील स्थापत्य शैलीत विविध प्रकारची शिल्पे कोरलेली असून तिचे संवर्धन होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी वेळोवेळी केली होती. त्यानुसार पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. या कामात लोकसहभाग लाभल्यास लवकरात लवकर या वस्तूला गत वैभव प्राप्त होऊ शकते. दोन अडीच वर्षापुर्वी बारव संवर्धन समितीचे सदस्य, साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांनी या मंदिरास भेट दिल्यानंतर येथील माजी सरपंच विलास साळवे यांच्यासोबत चर्चा केली होती. यापुर्वी काही परदेशी अभ्यासक ही निरिक्षण करुन गेले. मागील महिन्यात डॉ. संजय बोरूडे यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. या सर्व कामात कवी प्रभाकर साळेगावकर यांचा महत्वाचा वाटा आहे. जावेद देशमुख यांचेही सहकार्य लाभलेले आहे.
असे होणार काम
पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या वास्तू शिल्पाची पाहणी करून या करावे लागेल, याचा अंदाज आराखडा काढण्यात आला. ड्रोनद्वारे वस्तुस्थितीचे छायांकन करून समिती काही दिवसांतच आवश्यक सुधारणा लवकर करणार आहे.
३ कोटींचा खर्च अपेक्षित
वास्तू शिल्पाची पाहणी झाली असून कामाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. लवकरच त्याचे काम देखील सुरू करण्यात येणार आहे.मंदिर उभारण्यासाठी अंदाजित 3 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
- अमोल गोटे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग,छत्रपती संभाजीनगर