रूग्णसेवा वाऱ्यावर; बीड जिल्हा रुग्णालयात चक्क २०० डॉक्टर, कर्मचारी लेटलतीफ
By सोमनाथ खताळ | Published: February 6, 2023 11:48 AM2023-02-06T11:48:39+5:302023-02-06T11:49:44+5:30
या लेटलतीफ डॉक्टर, कर्मचाऱ्यांमुळे सामान्य रूग्णांचे हाल होत आहेत.
बीड : जिल्हा रूग्णालयात सकाळी प्रत्येकाने वेळेवर येऊन रूग्णसेवा देणे आवश्यक असते. परंतू डॉक्टर, कर्मचारी हे वेळेवर येत नसल्याचे सोमवारी चव्हाट्यावर आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी मुख्य गेटवर खूर्ची मांडून उशिरा येणाऱ्यांची हजेरी घेतली. यात एक-दोन नव्हे तर तब्बल २०० डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी उशिरा आल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संतोष शहाणे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.राम आवाड यांचाही समावेश होता. संस्थेचे प्रमुखच उशिरा येत असतील इतरांनी काय आदर्श घ्यायचा असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान परिचारीकांनी सकाळी ८ वाजता, डॉक्टरांनी ९ तर कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पावणे दहा वाजता कार्यालयात येणे अपेक्षित आहे. उशिरा येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी वाढल्याने स्वता: मुख्य गेटवर बसून हजेरी घेतली असता जवळपास २०० डॉक्टर, कर्मचारी उशिरा आल्याचे दिसले, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी सांगितले.
या लेटलतीफ डॉक्टर, कर्मचाऱ्यांमुळे सामान्य रूग्णांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांना तपासणीसाठी तासनतास वाट पहावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. या लेटलतीफांना केवळ नोटीस न बजावता त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाई करावी, तसेच यानंतर असे झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.