बीड शहरातील बिंदुसरेवरील नवा पूलही धोक्याचा
By Admin | Published: June 19, 2017 12:06 AM2017-06-19T00:06:19+5:302017-06-19T00:10:31+5:30
बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील निजामकालिन पूल कमकुवत झाल्यामुळे पात्रातून केलेला पर्यायी पूल कोसळल्यानंतर सत्ताधारी- विरोधकात पत्रकबाजी, आरोपांच्या फैरी झडत आहेत.
अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील निजामकालिन पूल कमकुवत झाल्यामुळे पात्रातून केलेला पर्यायी पूल कोसळल्यानंतर सत्ताधारी- विरोधकात पत्रकबाजी, आरोपांच्या फैरी झडत आहेत. दुसरीकडे शहर व पेठ भागाला जोडणाऱ्या नव्या पुलाच्या दुर्दशेकडे मागील एक वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हा पूलही धोक्याचा बनला असून, दुर्घटनेची वाट पाहत बसायचे काय? असा सवाल नागरिकांतून होत आहे.
गतवर्षी २ आॅक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे बिंदुसरा नदीला पूर आला होता. डॉ. आंबेडकर चौक, कंकालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग, जुना मोंढा, बालाजी मंदिर भागाला पुराचा फटका बसला. शेकडो व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. पुरात नवा पूल येथील यशवंतराव चव्हाण उद्यान (चमन) वाहून गेले. परिसरातील पुतळे राहिले मात्र झाडे उन्मळून पडली, तर नव्या पुलाचे सिमेंटचे कठडे तुटून वाहून गेले. चमनलगतचा भाग उघड्यावर पडल्याने वाहतुकीसाठी धोका असल्याचे स्पष्ट दिसत असताना कोणीही या बाबीकडे लक्ष दिले नाही. पूर ओसरल्यानंतर शहराच्या विकासाचा डांगोरा पिटणाऱ्यांसह साऱ्यांनीच मौन बाळगले. आता नऊ महिन्यानंतर पावसाळा सुरू होताच पुन्हा या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आहे.
बिंदुसरेवरेच्या मोठ्या पुलावरील कामाबाबत प्रशासन कार्यवाही करील परंतू नव्या पुलाच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय होईपर्यंत किमान पावसाळा कालावधीत सुरक्षेच्या दृष्टीने नगर पालिकेने व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.