लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी देवळा गावाचा नवा पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:37+5:302021-04-17T04:33:37+5:30
सामाजिक संस्थेने घेतला पुढाकार अंबाजोगाई : नेहमी सामाजिक कार्यात सहभाग घेऊन आपल्या गावाची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ...
सामाजिक संस्थेने घेतला पुढाकार
अंबाजोगाई :
नेहमी सामाजिक कार्यात सहभाग घेऊन आपल्या गावाची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावाने मानवलोकच्या पुढाकाराने कोविड लसीकरण मोहिमेला ही सर्व ग्रामस्थांना लस देण्यात पुढाकार घेऊन आपले वेगळेपण जपले आहे.
देवळा गावामध्ये ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
येथील मानवलोक उपकेंद्र पाटोदा व गिव्ह इंडिया संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण देवळा परिसरात कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून गुरूवारी ७२ जणांना लस देण्यात आली. यामध्ये सर्वात जास्त वृद्ध महिला व पुरुष मंडळीचा समावेश होता. या सर्वांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरणात भाग घेतला. ४५ ते ६० च्या वयोगट पुढील गरीब, निराधार महिला पुरुष मंडळीना सोबत घेऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे.
धानोरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर जाधव यांच्या नियंत्रणाखाली गुरूवारी महिला व पुरुषांना लस देण्यात आली. गुरूवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून ४ ते ५ हजार ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन कोरोना आजाराबद्दल जनजागृती केली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणकोणते नियम पाळावेत याचीही माहिती देण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांना ने-आणण्यासाठी वाहनाची सोय करण्यात आली होती तर काही नागरिकांनी स्वतःच्या वाहनांनी धानोरा रुग्णालयात जाऊन स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेतले.
कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असून देवळा परिसरातील नागरिकांनी यात सहभागी होऊन या मोहिमेचा लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. सदर लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मानवलोकचे ‘तृप्ती किचन’ देवळा श्रमकरी ग्रुपचे सदस्य बाबासाहेब यशवंत, कोमल बलाढ्ये, अण्णा जाधव, सविता जाधव, तुषार सोनवणे, रवींद्र देवरवाडे, डॉ. नदीफ आशा, जयश्री गायकवाड हे परिश्रम घेत आहेत.
अपप्रचार करू नये : रवींद्र देवरवाडे
कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून कोणीही घाबरून जाऊ नये. या लसीकरणाबाबत ज्यांना संशय आहे. त्यांनी संबंधित डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. याबाबत कोणीही अपप्रचार करू नये, अशी कळकळीचे आवाहन देवळा श्रमकरी ग्रुपचे रवींद्र देवरवाडे यांनी केले आहे.