संक्रांतीसाठी माहेरी जाण्यास मज्जाव केल्याने नवविवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 07:51 PM2020-01-13T19:51:35+5:302020-01-13T20:05:14+5:30
विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता.
बीड : हुंड्याचे पैसे आणण्यासाठी तगादा आणि त्यातच संक्रांत या सणासाठी माहेरी जाण्यास मज्जाव केल्याने कंटाळून पूजा विकास बिक्कड (२४) या विवाहितेने गळफास घेऊन रविवारी आत्महत्या केली. ही घटना शहरातील धानोरा रोडवरील महात्मा फुलेनगरात घडली. विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता.
पूजा हिचा हिचा हुंड्याच्या पैशासाठी सासरच्या मंडळीकडून छळ केला जात होता. तसेच १५ जानेवारी रोजी संक्रात सण असल्याने पूजा हिने माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, नवरा विकास याने जाण्यास नकार दिला. हुंड्यासाठी छळ आणि माहेरी न जाऊ दिल्यामुळे पूजा हिने रविवारी राहत्या घरी गळफास घेतला. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पूजाचे वडिल राजेंद्र केंद्रे (रा. सारूकडवाडी, ता.केज) यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती विकास, सासू लक्ष्मी बिक्कड व नणंद विद्या बिक्कड या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. मीना तुपे या करीत आहेत.