एकाच्या अंत्यसंस्कारावेळी तिघांच्या मृत्यूची वार्ता धडकली, चार कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 01:12 PM2023-02-02T13:12:17+5:302023-02-02T13:13:23+5:30

चौघेही गरीब कुटुंबातील असल्याने हमाली व मोलमजुरी करुन पोट भरत होते. घरातील कर्ते पुरुष गमवल्याने चारही कुटुंबे उघड्यावर आली आहेत, गावावर शोककळा पसरली आहे 

News of the death of three at the funeral of one; Four families lost their main man, the village mourned | एकाच्या अंत्यसंस्कारावेळी तिघांच्या मृत्यूची वार्ता धडकली, चार कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावले

एकाच्या अंत्यसंस्कारावेळी तिघांच्या मृत्यूची वार्ता धडकली, चार कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावले

googlenewsNext

- संतोष स्वामी 
दिंद्रुड (बीड) :
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. मयत तिघेही माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील रहिवासी होते‌. दरम्यान, रंग देताना जिन्यावर पडल्याने याच गावातील गंभीर जखमी तरुण भारत दिलीप गायकवाड या तरुणाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. भारतवर अंत्यसंस्कार सुरु असतानाच तिघांच्या मृत्यूची वार्ता धडकली. चार तरुणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबांनी घरातील कर्ते पुरुष गमावले आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, लहामेवाडी येथील लक्ष्मण सुभाष कापसे (वय ३६ वर्ष), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय ३० वर्ष ), अण्णा बळीराम खटके (वय 27 वर्ष) हे तीन तरुण तेलगाव येथील जिनिंगवर मजुरीचे काम करत होते. बुधवारी सायंकाळी काम झाल्यानंतर तिघेही एकाच दुचाकीवरून गावाकडे परतत होते. दरम्यान, माजलगावकडून धारूरकडे जाणाऱ्या कारने दुचाकीला समोरासमोर जबरदस्त धडक दिली यात. यातील दोघांना चारचाकीने दूरपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे दोघेजण जागेवरच ठार झाले. तर एकाचा उपचारार्थ माजलगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेले असता मृत्यू झाला. माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सपोनि प्रभा पुंडगे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाल्या.

एकाच्या अंत्यसंस्कारावेळी तिघांच्या मृत्यूची वार्ता
लहामेवाडी येथील भारत गायकवाड (३९) हा तरुण 27 जानेवारी रोजी देवदहीफळ येथे एका इमारतीस रंग देत असताना जिन्यावरून पडून जखमी झाला होता. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर औरंगाबाद येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. बुधवारी उपचार सुरु असतानाच भारतची प्राणज्योत मालवली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी गावकरी मयत भारतवर अंत्यसंस्कार करत असतानाच भीषण अपघातात गावातील तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकली. एकाच गावातील चार तरुण मृत झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

चार कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावले
मृत चौघेही विवाहित होते. भारत याच्या पश्चात आई-वडील, एक लहान भाऊ, पत्नी आणि दिड वर्षाची मुलगी असा परिवार आहे. आण्णा खटके यास 2 वर्षाची मुलगी व केवळ 6 महिन्याचा मुलगा आहे. नितीन हुलगे यास 7 वर्षाचा मुलगा व 10 वर्षाची मुलगी आहे तर लक्ष्मण कापसे यास 2 मुली व 1 मुलगा आहे. चौघेही गरीब कुटुंबातील असल्याने हमाली व मोलमजुरी करुन पोट भरत होते. घरातील कर्ते पुरुष गमवल्याने चारही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. 

Web Title: News of the death of three at the funeral of one; Four families lost their main man, the village mourned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.