आशा सेविकांपाठोपाठ एनएचएमचे कर्मचारीही संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:33 AM2019-09-17T00:33:50+5:302019-09-17T00:34:05+5:30
आशा सेविकांपाठोपाठ आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारीही सोमवारपासून संपावर गेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आशा सेविकांपाठोपाठ आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारीही सोमवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे कामकाज संथ गतीने सुरू आहे. सध्या विविध मोहीम हाती घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, हे कर्मचारी संपावर गेल्यावर मोहिमेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतलेला आहे.
सध्या बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने १३ ते २८ सप्टेंबर दरम्यान, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरूग्ण शोध मोहिम असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान, कुष्ठरूग्ण शोध अभियान संयुक्तपणे राबविले जात आहे. आगोदरच आशासेविका संपावर गेल्याने या मोहिमेत संथगती आली होती. तर आता एनएचएमचे कर्मचारीही संपावर गेल्याने या मोहिमेवर मोठा परिणाम झाला आहे. बीड जिल्ह्यात ७०० च्या जवळपास तर राज्यात १८ हजार कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर असून ते संपावर गेले आहेत. सध्या या कर्मचाऱ्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा या कर्मचा-यांनी घेतला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे हे धरणे आंदोलन होत आहे. राज्यभरातून अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
वैद्यकीय अधिका-यांची सुटी रद्द
आरोग्य विभागातर्फे सध्या विविध मोहीम, अभियान राबविले जात आहेत. या अभियानावर परिणाम होऊ नये, यासाठी ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांची मंगळवारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाची सार्वजनिक सुटी रद्द केली आहे. तसे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी काढले आहेत.