बीडला जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत निनादला जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:04 AM2018-03-26T00:04:52+5:302018-03-26T00:04:52+5:30
जय श्रीराम, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय? असा जयघोष रविवारी प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बीड शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत निनादला . शहरासह जिल्ह्यातील मंदिरांमध्येही श्रीराम जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जय श्रीराम, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय? असा जयघोष रविवारी प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत निनादला . शहरासह जिल्ह्यातील मंदिरांमध्येही श्रीराम जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला.
श्रीराम जन्मोत्सवाची तयारी एक महिन्यापासून जोमाने सुरु होती. श्रीराम जयंती सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने रविवारी सकाळी बार्शी नाका भागातील गणपती मंदिरापासून दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गाने व प्रमुख रस्त्यावरुन भगवे झेंडे लावलेल्या दुचाकींची रॅली जाताना प्रभू श्रीरामाचा जयघोष लक्ष वेधत होता. तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
जवळपास तीन तास ही रॅली शहरातून काढण्यात आली. प्रभू श्रीराम जयंती सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने दुपारी शहराचे ग्रामदैवत कंकालेश्वर मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. पाहण्यासाठी आबालवृद्धांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती. दुकानांचे ओटे, घरांच्या खिडक्या, गॅलरीतूनही नागरीक मिरवणुकीचा आनंद घेत होते. विविध राजकीय पक्षांचे नेते, विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते रामभक्त मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी होते. मिरवणुकीत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. वाहतूक नियंत्रण योग्य पद्धतीने केल्यामुळे वाहनांना कुठलाही अडथळा न होता मिरवणूक योग्य रीत्या पार पडली.