परळी पंचायत समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:12+5:302021-01-02T04:27:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : येथील पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरुद्ध ११पैकी ९ सदस्यांनी अविश्वास ठराव ...

No-confidence motion against Parli Panchayat Samiti chairpersons | परळी पंचायत समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली

परळी पंचायत समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : येथील पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरुद्ध ११पैकी ९ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. हा ठराव पारित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या ठरावावर विचारविनिमय करण्यासाठी दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता परळी पंचायत समितीच्या सदस्यांची एक विशेष सभा तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सभापतींविरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे.

परळी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात पंचायत समितीतील राष्ट्रवादी व भाजपच्या ९ सदस्यांनी मिळून अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे २२ डिसेंबर रोजी दाखल केला. त्यानुसार या अविश्वास ठरावासंदर्भात तहसील कार्यालय येथे पंचायत समिती सदस्यांची एक विशेष सभा घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. दरम्यान, बहुमताने अविश्वास ठराव मंजूर होण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी सदस्यांनी आखली आहे. सभापती गित्ते या नंदागौळ पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत, तर त्यांचे पती बबन गित्ते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक आहेत.

सदस्य गेले सहलीवर

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे सदस्य सहलीवर गेल्याचे सांगण्यात येते. दिनांक ७ जानेवारी रोजी हे सदस्य परळीत दाखल होतील. परळी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजपचे ४ व राष्ट्रवादी पुरस्कृत एक असे एकूण १२ सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचा एक सदस्य अपात्र ठरला आहे. त्यामुळे ११ सदस्य बैठकीला उपस्थित राहू शकतात.

Web Title: No-confidence motion against Parli Panchayat Samiti chairpersons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.