कचरा घंटागाड्यांवर पुरूष नव्हे आता ‘महिलाराज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:46 PM2019-09-15T23:46:59+5:302019-09-15T23:48:05+5:30
कचरा संकलन करण्यासाठी असलेल्या घंटागाड्यांवर पुर्वी पुरूष कर्मचारी असायचे. आता बीड पालिकेने वेगळी संकल्पना हाती घेत घंटागाड्यांची जबाबदारी महिलांकडे दिली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कचरा संकलन करण्यासाठी असलेल्या घंटागाड्यांवर पुर्वी पुरूष कर्मचारी असायचे. आता बीड पालिकेने वेगळी संकल्पना हाती घेत घंटागाड्यांची जबाबदारी महिलांकडे दिली आहे. घंटागाडी चालविण्यासह सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठीही महिलांची नियुक्ती केली आहे. यासाठी २० महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षणही दिले आहे. एका घंटागाडीवर एक चालक व दोन मदतनीस महिला असणार आहेत.
बीड पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ असले तरी स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारी कमी व्हाव्यात, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कचरा संकलनासाठी घंटागाड्यांवर पूर्वी पुरूष कर्मचारी होते. यात बदल करून सुरूवातीला १० घंटागाड्यांवर महिला चालकांची नियूक्ती केली आहे. यासाठी २० महिलांना प्रशिक्षण दिले असून, वाहन चालविण्याचा परवानाही त्यांना दिला आहे. एका घंटागाडीवर ओला व सुका कचरा वेगळा करण्यास दोन महिला मदतनीस राहतील. मागील महिनाभरापासून याचे नियोजन केले जात होते. यात स्वच्छता विभागाला यश आले आहे. या संकल्पनेचा स्वच्छ महाराष्ट्र मिशनमध्ये फायदा होणार आहे. याचे गुणांकन मिळण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्र.मुख्याधिकारी मिलींद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता राहुल टाळके, स्वच्छता निरीक्षक युवराज कदम, भागवत जाधव, सुनिल काळकुटे, भारत चांदणे, आर.एस.जोगदंड, ज्योती ढाका, प्रशांत जगताप, स्वाती कागदे, महादेव गायकवाड, गारबेज क्लिनीकचे प्रवीण नायक आदी नियोजन करीत आहेत.
काम करा आणि कमवा
घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगळे करण्याचे आवाहन या महिला करणार आहेत. तसेच संवादही साधणार आहेत. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट तर सुक्या कचऱ्यांपासून विविध वस्तू तयार केल्या जाणार आहेत. यातून मिळणा-या पैशातूनच या महिलांना मानधन दिले जाणार आहे. काम करा आणि कमवा, अशी काहीशी ही संकल्पना आहे. सर्व यंत्र सामग्री पालिकेची राहणार असून महिलांना रोजगारही मिळणार आहे.