पाच वर्षांपासून ना प्रसूती ना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:01+5:302021-08-20T04:38:01+5:30

राहण्यायोग्य इमारत नसतानाही जीव धोक्यात घालून कर्मचारी करतात कामे नितीन कांबळे कडा : आरोग्य विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून ...

No maternity or family welfare surgery camp for five years | पाच वर्षांपासून ना प्रसूती ना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर

पाच वर्षांपासून ना प्रसूती ना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर

Next

राहण्यायोग्य इमारत नसतानाही जीव धोक्यात घालून कर्मचारी करतात कामे

नितीन कांबळे

कडा : आरोग्य विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा डांगोरा पिटला जात आहे. असे असले तरी सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील दयनीय अवस्था पाहता धोकादायक इमारत असल्याचा अहवाल असूनदेखील जीव धोक्यात घालून येथील कर्मचारी काम करतात.

विशेष म्हणजे पाच वर्षांपासून या ठिकाणी ना प्रसूती ना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली. गोळ्या, औषध, इंजेक्शनवरच समाधान मानून पुढील उपचारांसाठी इतरत्र पाठविले जात असल्याने रुग्णांची मोठी परवड होताना दिसत आहे.

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, याअंतर्गत ४४ गावे आणि ४० हजार ६३२ लोकसंख्या व पाच उपकेंद्रे येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रांत कसल्याच सोयी-सुविधा नसल्याने अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवासस्थानेदेखीव खराब झाली आहेत.

आष्टी येथील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१६ रोजी येथील इमारत धोकादायक असून, राहण्यायोग्य नसून जीवितास धोका असल्याचा अहवाल दिला असताना आरोग्य सेवा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था असायला हवी होती; पण या धोकादायक इमारतीमध्येच आरोग्य अधिकारी, कर्मचारी आपला जीव मुठीत धरून कामकाज करत आहेत. आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने व नवीन इमारत नसल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रात २०१६ पासून आजपर्यंत एकाही महिलेची प्रसूती किंवा कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेली नसल्याने महिलांना कडा, धामणगाव, असा प्रवास करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर दोन महिला या वाहनातच प्रसूत झाल्या आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कसलीच दखल घेतली जात नसून अनेक वेळा लेखी, तोंडी पाठपुरावा केला आहे. आता नवीन इमारतीचे काम लवकर लवकर करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके, दीपक डहाळे, यांनी केली आहे.

याबाबत आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. जयश्री शिंदे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मी नुकताच पदभार घेतला आहे. या ठिकाणी प्रसूती व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होत नाही हे बरोबर आहे; पण नवीन इमारत व गैरसोयीबद्दल मला सांगता येणार नाही. मी विचारून माहिती घेऊन सांगते, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

190821\20210816_103429_14.jpg

Web Title: No maternity or family welfare surgery camp for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.