कोणी कितीही ओरडा; ना रस्ते झाले, ना खड्डे बुजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:45+5:302021-09-26T04:36:45+5:30
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली आहे. नवीन रस्ते करण्यासह खड्डे बुजविण्यासाठी अनेकांनी मागणी केली. आंदोलने ...
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली आहे. नवीन रस्ते करण्यासह खड्डे बुजविण्यासाठी अनेकांनी मागणी केली. आंदोलने करून उपोषणेही केली, परंतु याचा कसलाच फरक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नगर पालिकेला पडलेला नाही. रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कोणी कितीही ओरडले तरी परिस्थिती बदलत नसल्याचे चित्र शहरात सध्या तरी दिसत आहे.
बीड शहरात सध्या पालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सामान्य नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते आदी समस्या वाढत आहेत. तरीही याच्याबाबत कोणीच बोलायला तयार नाही. शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे आणि नगर रोडवर तर खड्डेच खड्डे झाले आहेत. अक्षरश: महामार्गाची चाळणी झाली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच आपने खड्डे मोजून अनोखे आंदोलन केले होते, परंतु याचा कसलाच फरक अद्यापपर्यंत झालेला नाही. नवीन रस्ता करणे तर दूरच परंतु त्या खड्ड्यात डांबर टाकून डागडुजी करण्याची तसदीही कोणी घेतली नसल्याचे दिसते. काही लोक विचारणा करायला गेल्यावर पाऊस उघडल्यावर करू, असे आश्वासन दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे, परंतु या समस्यांमुळे नागरिक व वाहनधारक खूप वैतागले असून संतापही व्यक्त करत आहेत.
काकाने दाखविला व्हिडिओ, पुतण्या म्हणतात खड्डे बुजवू
काही दिवसांपूर्वीच नगर रोड, जालना रोडवरील खड्ड्यांचा व्हिडिओ बनवून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दाखविला होता. त्यानंतर आ.संदीप क्षीरसागर यांनी पाऊस कमी होताच खड्डे बुजवू असे पत्रक माध्यमांना दिले होते, परंतु अद्यापपर्यंत यावर काहीच झालेले नाही. नगराध्यक्षांकडून केवळ नगररोडवरील खड्डे दाखविले जातात, शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे वादविवाद बाजूला ठेवून शहरातील सर्व रस्ते दर्जेदार करून नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी बीडकरांमधून होत आहे.
--
रस्ते चिखलमय, अपघात वाढले
शहरातील अंतर्गत रस्ते खराब झाल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. काही ठिकाणी नाल्यांतील पाणी रस्त्यावर येते. यातून मार्ग काढताना पादचारी आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याच खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. असे असले तरी पालिकेला काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र दिसत आहे.
---
शहरातील रस्ते दुरुस्तीबाबत विशेष निधीची तरतूद केलेली आहे. काही ठिकाणी दुरुस्ती झाली असून काही ठिकाणी होणार आहे.
डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद, बीड
250921\25_2_bed_30_25092021_14.jpeg
बीड शहरातील मोढा रोडवील पुलावर अशाप्रकारे मोठ मोठी खड्डे पडली आहेत.