यापुढे कोरोनाबाधितांना गृहविलगीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:31+5:302021-05-21T04:35:31+5:30
बीड : कोरोनाबाधित असलेल्या, परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने गृह विलगीकरणाची परवानगी दिली जात होती. परंतु, आता ...
बीड : कोरोनाबाधित असलेल्या, परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने गृह विलगीकरणाची परवानगी दिली जात होती. परंतु, आता ती बंद केली आहे. गृहविलगीकरण न देता संस्थात्मक विलगीकरण करा, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर समितीही गठीत करण्याच्या सूचना केल्या आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासन कडक निर्णय घेत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत जे लोक कोरोनाबाधित आढळले आहेत, परंतु त्यांना लक्षणे नाहीत, अशांना कोविड केअर सेंटर अथवा कोविड रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य कार्यवाही करून गृह विलगीकरणाची परवानगी दिली जात होती. परंतु, काही लोक विलगीकरणात राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. हाच धागा पकडून आता जिल्हा प्रशासनाने यापुढे गृह विलगीकरण देण्याची परवानगी बंद केली आहे. प्रत्येक बाधिताला गावातील शाळा, महाविद्यालय अथवा इतर शासकीय इमारतीत संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांची समिती गठीत केली आहे. विलगीकरणातील रुग्णांना पाणी, वीज, आदी सुविधा पुरविण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. तसेच जेवण मात्र घरूनच मागवावे लागणार आहे. या विलगीकरण स्थळी २४ तास कर्मचारी नियुक्त करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जगताप यांनी दिल्या आहेत.