बर्ड फ्लूबाबत घाबरण्याचे कारण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:27 AM2021-01-14T04:27:52+5:302021-01-14T04:27:52+5:30
बीड : जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव, आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव, शिरापूर भागात मृत पक्षी आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, संबंधित ...
बीड : जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव, आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव, शिरापूर भागात मृत पक्षी आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, संबंधित क्षेत्र संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करून तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या आजाराबाबत जनतेमधील नकारात्मकता व घबराट दूर करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जनतेने घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अद्याप पाळीव पक्ष्यांमध्ये या आजाराचे निदान झालेले नाही. तरीही आपल्या भागातील आजारी पक्ष्यांबरोबर संपर्क
टाळावा. कोंबड्यांसह इतर पक्ष्यांना खाद्य व पाणी दिले जाणारी भांडी डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवावीत. एखादा पक्षी मरण पावला तर ग्लोज घातल्याशिवाय त्याला स्पर्श करू नये. ही बाब तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कच्चे कुक्कुट मांस विक्रेते व ते हाताळणारांनी काम करताना हात पाणी व साबणाने वारंवार धुवावेत. वैयक्तिक स्वच्छता राखावी. परिसर स्वच्छ ठेवावा. कच्चे चिकन व चिकन उत्पादनासह इतर कामे करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करावा. आपल्या परिसरात तलाव असेल व त्या तलावात पक्षी येत असतील तर याबाबत सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वन विभाग पशुसंवर्धन विभागास कळविण्याचे आवाहन केले आहे.
आजारी पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नका
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कच्चे चिकन, अंडी, अर्धवट शिजलेले अथवा उकडलेले चिकन खाऊ नये,
आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नये, पूर्ण शिजलेले व कच्चे मांस एकत्र ठेवू नये, एखाद्या भागात मृत पक्षी आढळल्यास घ्यावयाची दक्षता तसेच मृत पक्ष्याची विल्हेवाट कशी लावावी, यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.