"माझा आवाज कोणीही दाबू शकणार नाही"; पंकजा मुंडेंचा मेळाव्यातून थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 03:36 PM2023-10-24T15:36:04+5:302023-10-24T15:52:08+5:30
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कायम ठेवली आहे
बीड - भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा हुंकार भरला आहे. पंकजा यांनी शिवशक्ती परीक्रमा यात्रेनंतर आलेल्या नोटीसाचा उल्लेख करत, दसरा मेळाव्याला जमलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. माझ्या मदतीसाठी तुम्ही दोन दिवसांत ११ कोटी रुपये जमा केले. मात्र, मी ते पैसे घेणार नाही आणि तुमचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही, असे पंकजा यांनी म्हटले. मी पराभवानंतर खचले नाही, शिवशक्ती परीक्रमेतून मला तुमच्या कुबड्या मिळाल्या. दोन महिन्यात मॅरेथॉन पळायची ताकद आली, असे पंकजा यांनी म्हटले. यावेळी, पंकजांनी पक्षाचाही उल्लेख केला.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कायम ठेवली आहे. आज दसरा मेळाव्यास संबोधित करताना पंकजा यांनी समाजास भावनिक साद घातली. तसेच, पक्षातील राजकीय नेतेमंडळींना अप्रत्यक्षपणे इशाराही दिलाय. पंकजांच्या भाषणावेळी माईकचा आवाज सर्वदूर पोहोचत नव्हता. त्यामुळे, आपल्या मेळाव्यात बाहेरचं कोण घुसलंय, माझा आवाज बंद करायचा प्रयत्न कोणी केली, कोणी माझी वायर कापली. मात्र, माझा आवाज बंद होणार नाही, असे म्हणत पंकजा यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय नेत्यांना इशाराच दिला आहे. दरम्यान, यावेळी पंकजा मुंडेंनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा उल्लेख करत, नित्तीमता सोडून राजकारण करता येत नाही, असे पंकजा यांनी म्हटलं.
माझ्याकडे फक्त नीतीमत्ता आहे. कोण म्हणते मी या पक्षात चालले, त्या पक्षात चालले. त्रिदेवांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आले. आता आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर उन्हात बांधू. माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आता संयम नाही. मी घरी बसणार नाही, मैदानात उतरणार, असे जाहीर करत पंकजा मुंडे यांनी प्रीतम ताई घरी बसतील तुम्ही लढा, असे चालणार नाही, असा थेट इशारा भाजपा पक्ष नेतृत्वाला दिला.
मुंडे म्हणाल्या, माझ्याकडे कोणतेही पद नसताना मी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली.प्रत्येक ठिकाणी माझे जोरदार स्वागत झाले. शेवटचे पद हाती असताना लोकांसाठी अनेक काम केली. मी पराभूत झाले पण कधीच मनाने खचले नाही, तुमची सेवा करण्यात खंड पडला. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, यामुळे तुमची हात जोडून माफी मागते.
महाराष्ट्रात आरक्षणाचे गंभीर प्रश्न
माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा दोन दिवसांत तुम्ही कोट्यावधी रुपये जमा केले. मी एखादी निवडणूक हरले जरी तरी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही, माझ्याकडे तुम्हाला देण्यास काही नाही, अशी भावनिक साद मुंडे यांनी घातली. तसेच महाराष्ट्रात सध्या गंभीर प्रश्न आहेत, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे. अपेक्षाभंगाचे दु:ख सहन करण्याची सहनशक्ति आता कोणत्याच समाजात नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.शेतकरी सुखी नाही, पिकविमा मिळत नाही, उसतोड मजुरांना पैसा वाढवून द्या,अशा मागण्या देखील मुंडे यांनी केल्या.