कुणीही प्लॅटफॉर्म तिकीट काढत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:33 AM2021-03-17T04:33:41+5:302021-03-17T04:33:41+5:30
परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसोबत येणाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अनेक स्थानकांवर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये केले होते. परळी ...
परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसोबत येणाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अनेक स्थानकांवर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये केले होते. परळी येथील रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे आदेश नसल्याने कोणीही प्लॅटफॉर्म तिकीट काढीत नाही, असे आढळून आले.
प्लॅटफॉर्म तिकीट घेण्यासंदर्भात कुठलाही बोर्ड रेल्वेस्थानक परिसरात आढळून आला नाही. रेल्वे डब्यातील सीट आरक्षित करून रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांसोबत जास्त गर्दी नसते. कोरोना पार्श्वभूमीमुळे रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद नसल्याने रेल्वे गाडी येताच रेल्वेस्थानकावर प्रवाशाशिवाय अन्य कोणी ही दिसत नाही. त्यामुळे गर्दी होत नाही. केवळ विशेष रेल्वे गाड्याच परळी रेल्वेस्थानकमार्गे धावत आहेत, तर पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी आढळून येत नाही.
प्लॅटफॉर्म तिकीट बंधनकारक केलेले नाही.
कोरोना परिस्थितीमुळे रेल्वेस्थानकावर गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दर पन्नास रुपये करण्यात आला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी येथील रेल्वेस्थानकावर अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे परळी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री केली जात नाही. फक्त आरक्षित सीट केलेले प्रवासीच रेल्वेस्थानकातून प्रवास करीत आहेत. परळी रेल्वे स्थानकातून अद्याप काही विशेष रेल्वे गाड्याच धावतात. पॅसेंजर रेल्वे गाड्या धावत नसल्याने या रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी होत नाही. रेल्वेस्थानकात आरक्षित तिकिटाशिवाय येणाऱ्या इतरांना बंदी आहे. तरीही एखादा दुसरा व्यक्ती आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येतात. त्यांची विचारपूस केली जात नाही. शुक्रवारी सायंकाळी बंगळुरू - नांदेड या रेल्वे गाडीस तुरळक प्रवासी दिसले. त्यामुळे रेल्वेस्थानकावर शुकशुकाट दिसून आला.
या रेल्वे धावतात परळी मार्गे
शिर्डी- काकीनाडा, काकीनाडा - शिर्डी, बंगळुरू - नांदेड, नांदेड - बंगळुरू, औरंगाबाद - हैद्राबाद, हैदराबाद- औरंगाबाद, पनवेल - नांदेड, नांदेड - पनवेल या विशेष रेल्वे गाड्या सुरू आहेत. आठवड्यातून एकदा कोल्हापूर - धनबाद ही रेल्वे सुरू झालेली आहे .
एवढे प्रवासी प्रवास करतात
परळी रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे ३२५ प्रवासी प्रवास करतात. एका रेल्वेगाडीमध्ये सगळीकडचे मिळून ७०० प्रवासी असतात.
प्लॅटफॉर्मची तिकीट विक्री नाही
परळी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्री अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. कोरोना परिस्थितीमुळे रेल्वेस्थानकावर गर्दी होऊ नये, या दृष्टिकोनातून प्लॅटफॉर्म तिकिटाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पूर्वी रेल्वेस्थानकाच्या गेटवर रेल्वेचे अधिकारी येणारे - जाणारे यांच्याकडे तिकीट आहे का, याची चौकशी करीत असत. परंतु सध्या तसे दिसत नाही.
बालाजी गायकवाड, परळी
परळी रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकात म्हणावी तशी गर्दी नाही.
धनंजय बिराजदार, परळी.
रेल्वे स्टेशन मास्तरची प्रतिक्रिया.
प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीबाबत अद्याप रेल्वे प्रशासनाकडून परळी रेल्वे स्थानकाला आदेश आलेला नाही. जेव्हा आदेश येतील तेव्हा प्लॅटफॉर्म तिकीट विक्री सुरू करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया परळी रेल्वे स्टेशन मास्तर मीना यांनी दिली.
===Photopath===
160321\16bed_2_16032021_14.jpg~160321\16bed_1_16032021_14.jpg
===Caption===
परळी रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे आदेश नाही