जि.प.चा एकही शिक्षक बीड जिल्ह्यात अतिरिक्त नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:34 AM2019-07-14T00:34:37+5:302019-07-14T00:35:19+5:30
जिल्हा परिषदेच्या २५१ शिक्षकांचे शासन नियमानुसार समायोजन करुन त्यांना पदस्थापना देण्यात आली. शनिवारी तहसील कार्यालयात पारदर्शी पध्दतीने ही प्रक्रिया पार पडल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
बीड : जिल्हा परिषदेच्या २५१ शिक्षकांचे शासन नियमानुसार समायोजन करुन त्यांना पदस्थापना देण्यात आली. शनिवारी तहसील कार्यालयात पारदर्शी पध्दतीने ही प्रक्रिया पार पडल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
मुख्याध्यापक पदी पदोन्नतीची प्रक्रिया झाल्यानंतर शिक्षकांचे समायोजन व त्यांच्या पदस्थानेचा विषय जि. प. प्रशासन व शिक्षण विभागासमोर होता. विस्थापित, अतिरिक्त, रॅन्डममधील शिक्षकांचे समायोजन विविध कारणांमुळे तीन वेळा पुढे ढकलावे लागले. अखेर शनिवारी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात शिक्षक समुपदेशन व पदस्थापना प्रक्रिया पार पडली. २५३ शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलवले होते. यामध्ये ११३ महिला आणि १४० पुरुष असा शिक्षकांचा समावेश होता. सुरुवातीला महिला शिक्षकांच्या समायोजनेसह पदस्थापनेची प्रक्रिया पार पडली. प्रारंभी दोन महिला शिक्षकांनी पदस्थापना प्रक्रियेतून माघार घेतली. १११ महिला व १४० पुरुष शिक्षकांना अपेक्षित पदस्थापना मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ धनवंतकुमार माळी, शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, उप शिक्षणाधिकारी हिरालाल कराड, भगवान सोनवणे, सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी तुकाराम पवार, विठ्ठल राठोड, डी. बी. धोत्रे, धनंजय शिंदे, सहायक प्रशासन अधिकारी पी. बी. आर्सूळ, अधीक्षक, गिरीश बिजलवाड, डी. एस. मोकाडे, बी. डी. जाधव, सुनील शेडुते, डी. एस. जोशी, एन. बी. कदम, दिलीप पुलेवाड, अविनाश गजरे, मनोज लोखंडे, तुषार शेलार आदी उपस्थित होते.
सर्वांना पदस्थापना
प्रशासनाने अगोदर मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया राबविल्यामुळे व २८ शिक्षकांनी ते बारावी विज्ञानचे असल्याने प्राथमिक पदवीधरच्या रिक्त जागी पदस्थापना मागितली. त्यामुळे एकही शिक्षक पदस्थापनेविना राहिला नाही. तसेच अनेक वर्षापासून गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार
समुपदेशन स्वाक्षरी करून अनुपस्थित ३ शिक्षकांना नोटीस देऊन खुलासा मागवून कार्यवाही करण्यात येईल. सर्व शिक्षकांना पदस्थापना मिळाल्यामुळे आता संबंधित शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
गुणवत्ता वाढवा
समुदेशन पद्धतीने सोयीच्या पदस्थापना मिळाल्या आहेत. गुणवत्ता वाढवावी असे आवाहन शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केले. प्रशासनाने केलेल्या कार्यवाही आणि घेतलेल्या परिश्रमाची ही त्यांनी दखल घेतली.
निलंबित व अनधिकृत गैरहजर शिक्षक यांच्या पदस्थापनेचा निर्णय पुढील प्रशासकीय कार्यवाहीनंतर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिक्षकांच्या वतीने भारती कोकाटे यांनी पारदर्शक पद्धतीबद्दल व नियमानुसार प्रक्रि या राबविल्याबद्दल प्रशासनाचे प्रतिनिधिक स्वरूपात आभार मानले.