ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून येतो मोठा आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:47+5:302021-06-19T04:22:47+5:30
अंबाजोगाई : कोविडच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या विदारक परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वाराती रुग्णालयात कार्यन्वित केलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ...
अंबाजोगाई : कोविडच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या विदारक परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वाराती रुग्णालयात कार्यन्वित केलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या जुन्या प्रकल्पाचेच आरोग्य बिघडले असून या प्रकल्पातून सतत कर्णकर्कश आवाजामुळे स्वाराती रुग्णालयातील रुग्णांची धाकधूक वाढली आहे, तर कर्मचाऱ्यांवर यांचा ताण येऊ लागला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा जुना प्रकल्प काढून या रुग्णालयाच्या मेडिसीन विंगच्या ‘ए’ इमारतीलगत २७ एप्रिल २०२१ रोजी कार्यान्वित केला होता. या प्रकल्पातून प्रति तासाला ८६ हजार लि. ऑक्सिजन निर्मितीचा दावा करण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पातून प्रत्यक्षात प्रशासनाने केलेल्या दाव्याच्या ४० टक्केच ऑक्सिजन निर्मिती होत आहे.
या प्रकल्पात संपूर्ण हवा घेण्यात येऊन त्यातून फक्त ऑक्सिजनची साठवणूक करण्यात येते व धुळीत हवा बाहेर फेकली जाते. ही धुळीत हवा बाहेर फेकताना हा प्रकल्प सुरू झाल्यापासून प्रति मिनिटाला सतत कर्णकर्कश आवाज येत आहे. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाचा आवाज त्वरित बंद करावा अथवा ऑक्सिजनची टंचाई नसेल तर हा प्रकल्प सायलेंसर येईपर्यंत तरी बंद करावा, अशी मागणी आयसीयू कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्ण आणि नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.
ऊर्जामंत्र्यांकडे केली तक्रार
हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या या प्रकल्पास पाच दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भेट दिली होती. यावेळी अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांनी या प्रकल्पातून येणारा कर्णकर्कश आवाज त्वरित बंद करावा, अशी मागणी केली होती. हा आवाज बंद करण्यासाठी आठ दिवसांच्या आत या प्रकल्पास सायलेंसर बसवण्यात येतील, असे ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही हे सायलेंसर बसवण्यात आले नाहीत.
१) दूषित हवा बाहेर सोडताना कर्णकर्कश आवाज येऊ नये यासाठी या प्रकल्पात तीन सायलेंसर असतात. ते या प्रकल्पात बसवले गेले नसल्यामुळे या प्रकल्पातून प्रति मिनिटाला हा कर्णकर्कश आवाज येतो.
२) या प्रकल्पाला लागूनच स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या मेडिसीन विभागातील आयसीयू, कोविड रुग्णांचे आयसीयू, बालरोग कक्ष असे एकंदरीत नऊ आंतररुग्ण कक्ष आहेत. या ठिकाणी २४ तास रुग्णांवर उपचार सुरू असतात.
३) याच इमारतीत -हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांवरही उपचार करावे लागतात. अशा रुग्णांना उपचारासाठी एकदम शांत, गर्दी आणि आवाज न येणारा परिसर हवा असतो. हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या या प्रकल्पामुळे या रुग्णांच्या आरोग्यावर आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो आहे.
===Photopath===
180621\avinash mudegaonkar_img-20210616-wa0072_14.jpg