सोयाबीनच्या भाववाढीचा नाममात्र शेतकऱ्यांना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:31 AM2021-04-15T04:31:27+5:302021-04-15T04:31:27+5:30
अंबाजोगाई : तालुक्यात यंदा सोयाबीनच्या भावाने प्रतिक्विंटल सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. आवक कमी व भाव जास्त अशी ...
अंबाजोगाई : तालुक्यात यंदा सोयाबीनच्या भावाने प्रतिक्विंटल सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. आवक कमी व भाव जास्त अशी सोयाबीनची स्थिती झाली आहे. सोयाबीनच्या या विक्रमी भावाचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. यावर्षीच्या खरीप हंगामात पाऊस चांगला झाल्याने सोयाबीनचा उताराही मोठ्या प्रमाणात निघाला. शेतकऱ्यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या कालावधीतच मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केली. यावेळी सोयाबीनला ३४०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. मात्र, आता तो भाव ६८००च्या पुढे गेला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. सामान्यपणे खरीप व रद्दी अशी हंगामातील दोन पिके घेतली जातात. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बँकेचे घेतलेले कर्ज अथवा सावकाराचे कर्ज किंवा उसनवारीवर आणलेले पैसे फेडण्याची घाई असते. त्यामुळे शेतात उत्पादन झालेला माल तात्काळ बाजारपेठेकडे आणण्याचा कल शेतकऱ्यांचा असतो. त्यावेळी जो भाव मिळेल तो पदरात पाडून घ्यायचा अशी सवयच शेतकऱ्यांना लागली आहे. जर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडतीवर माल आणून टाकला तर तिथे किती दिवस ठेवायचा, ठेवलेल्या मालाची सुरक्षितता काय, असे विविध प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतात. भाववाढीसाठी सोयाबीन ठेवायचे तर अंबाजोगाईत मोठे वेअर हाउसही उपलब्ध नाही. त्या वेअरहाउसमध्ये माल ठेवण्यासाठी लागणारे भाडे, वाहतुकीचा खर्च, याबाबी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे आहे त्या किमतीत सोयाबीन विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर आता पाच ते सहा महिन्यांनी सोयाबीनचे भाव अचानकच मोठ्या प्रमाणात वाढले. आता बाजारात कमी झालेली आवक त्यामुळे शेतकऱ्यांना या भाववाढीचा म्हणावा तसा लाभ मिळणार नाही. मात्र, ज्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करून ठेवलेली आहे, त्यांना याचा होणार असल्याचे समोर आले आहे.