अवकाळी आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर संकट; कापणी-मळणीला आलेला शेतमाल उघडयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 08:51 PM2020-03-27T20:51:36+5:302020-03-27T20:51:36+5:30
निसर्गाचा कोप अन् कोरोनामुळे बळीराजा दुहेरी संकटात
- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई : कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन व सुरू झालेली संचारबंदी त्यातच या आठवडयात झालेली गारपीट व वादळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे कापणीसाठी व मळणीसाठी मजूर मिळेना. शेतकºयांचा राहिलेला माल उघडयावर पडून आहे. निसर्गाचा कोप व कोरोना यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.
अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वी सलग दोनवेळा गारपीट व वादळी पाऊस झाला. या वादळी पावसात गहू, ज्वारी, हरभरा, मका, आंबे, टरबूज, खरबूज व भाजीपाल्यांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणचे हरभºयाचे ढीग वादळाबरोबर विस्कटले. तर अनेक ढीग पावसात भिजले. शेतात उभी असणारी ज्वारी सुसाट वाºयामुळे आडवी पडली. भाजीपाला, टरबूज व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढून ठेवलेला माल मळणी करण्यासाठी तर शेतात उभी असणारी ज्वारी काढण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतात माल तसाच उभा आहे. अजूनही अवकाळी पावसाचा नेम सांगता येत नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागही लॉकडाऊन झाला आहे.
शासनाने पुढचे २१ दिवस घराबाहेर पडू नका असा आदेश काढल्याने ग्रामीण भागातही घराच्या बाहेर येण्यासाठी कोणी धजावत नाही. ग्रामीण भागातही संचारबंदी सुरू असल्याने शेतात जनावरांना सांभाळणे मोठ्या जिकीरीचे काम बनले आहे. मोठ्या प्रमाणात लागवड केलेला भाजीपाला शहरापर्यंत पोहचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने आहे या ठिकाणी भाजीपाला सडू लागला आहे. अशा अनेक समस्यांनी शेतकºयांना ग्रासले आहे.
जीव धोक्यात घालून शेतकरी शेतात
संचारबंदी व घराबाहेर न निघण्याचे आदेश असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून शेतकरी शेतात जाऊन आपली बैलजोडी, गाई, म्हशी, यांना चारापाणी व त्यांचा सांभाळ करत आहेत. आहे हे दुध करायचे काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक व्यवस्था बंद पडल्याने अनेक दुध उत्पादकांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.
गुढी बदलली पण सालदार मिळेना
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शेतातील सालदाराचा पहिला दिवस असतो. या दिवशी शेतात येऊन तो सर्व माहिती करून घेतो व आपल्या कामाचा प्रारंभ करून वर्षभराच्या कामाचे नियोजन करतो. मात्र, या वर्षी लॉकडाऊनमध्ये गुढीपाडवा आला. सालदारही साल ठरवायला आले नाहीत. त्यामुळे अनेक कामांना खो बसल्याने स्वत: मालकालाच पुढाकार घेऊन शेतीतील कामे करण्याची वेळ आली आहे.