परळीच्या उपजिल्हा रूग्णालयास महिलांचे प्रसूतीसाठी प्राधान्य, दोन महिन्यात 324 महिलांची झाली नॉर्मल प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 04:11 PM2017-10-12T16:11:17+5:302017-10-12T16:15:38+5:30
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 329 महिलांची प्रसूती झाली आहे. यातील 324 महिलांची नॉर्मल प्रसूती झाली तर ५ सिजेरीअन आहेत. नॉर्मल प्रसूतीची वाढती संख्या व येथील विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे या रुग्णालयात उपचारासाठी येण्यास महिला प्राधान्य देत आहेत.
परळी (बीड), दि.12 : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 329 महिलांची प्रसूती झाली आहे. यातील 324 महिलांची नॉर्मल प्रसूती झाली तर 5 सिजेरीअन आहेत. नॉर्मल प्रसूतीची वाढती संख्या व येथील विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे या रुग्णालयात उपचारासाठी येण्यास महिला प्राधान्य देत आहेत.
शहरातील शासकीय उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, महिला कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे महिलांना व्यवस्थित व योग्य उपचार होत आहेत. यामुळे प्रसूतीसाठी खाजगी रूग्णालयात होणारा भरमसाठ खर्च टळल्या जात आहे. याशिवाय ऍपेंडीक्स, हारणिया, गर्भाशयाची पिशवी काढणे व इतर शस्त्रक्रियाही करण्याची सुविधा असल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. वैद्यकिय अधिकारी स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुनिल जाधव, डॉ. रामेश्वर लटपटे, डॉ. संजय गित्ते, डॉ. विजय गोरे, निता मगरे, एन.पी. चिखले, एस.एल. कावळे, शेप यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे महिलांच्या प्रसूती काळजीपूर्वक होत आहेत. तज्ञ डॉक्टरांची टीम येथे सदैव तयार असल्याने गरोदर मातांनी शासकिय उपजिल्हा रूग्णालयातच उपचार घ्यावेत व खाजगी रुग्णालयात जाण्याचा खर्च टाळावा असे आवाहनही डॉ.मंडलेचा यांनी केले.
रुग्णांचा वाढता ओघ
ऑगस्ट 2017 मध्ये 168 गरोदर महिलांची नॉर्मल प्रसूती डिलेव्हरी झाली आहे. तर 3 महिलांची सिजेरीअन प्रसूती झाली. तसेच अपेंडीक्सच्या ३ शस्त्रक्रिया झाल्या. सप्टेंबर 2017 मध्ये 156 महिलांच्या नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत व 12 महिलांच्या सिजेरीअन प्रसूती झाल्या. यासोबतच दोन रूग्णांचे अपॅंडीक्सचे ऑपरेशन करण्यात आले.
मातांसाठी विशेष सुविधा
रूग्णालयात येणाऱ्या महिलांना दोन वेळचे जेवण, नाष्टा व चहाची सोय असते. तसेच, दारिद्रय रेषेखालील व अनुसूचित जाती-जमितीच्या महिलांना प्रसूतीनंतर 600 रुपयाचा धनादेश सुद्धा शासनाच्या वतीने देण्यात येतो.
दर शनिवारी येणार जिल्हा शल्य चिकित्सक
काही दिवसांपूर्वी गर्भाशयाची पिशवी काढणे व अपेंडिक्स अशा दोन शस्त्रक्रियासाठी बीड येथून स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात आले होते. यापुढे दर शनिवारी सीजर, अपेंडिक्स, हर्निया, गर्भाशयाची पिशवी काढणे, दुर्बीणीद्वारे कुटूंब कल्याण शस्त्रक्रियासुद्धा स्वत: डॉ. थोरात करणार आहेत.याचा रूग्णांनी लाभ घ्यावा असेही उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.