माजलगावात १०० ऐवजी ७८ फुटांचा रस्ता; नियम डावलून कशी तरी कामे करण्याचा कंपनीचा सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 04:17 PM2018-09-07T16:17:28+5:302018-09-07T16:19:50+5:30
हा रस्ता १०० फुटांचा न होता केवळ ७८ फुटांचाच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
माजलगाव (बीड ) : शहरातील मुख्य रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हा रस्ता १०० फुटांचा न होता केवळ ७८ फुटांचाच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या या सिमेंट रस्त्याच्या झालेल्या कामावर पाणी टाकले जात नसल्याने व काम सुरू झाल्यापासून कोणताही अधिकारी नियंत्रणासाठी फिरकला नसल्याने दर्जाबाबत नागरिक संभ्रमात आहेत.
अधिकारी कामाच्या दर्जाबाबत सर्व काही कंपनीवर सोपवून जालना येथूनच उंटावरून शेळ्या हाकू लागले आहेत. काम चांगले होत आहे किंवा नाही व हा रस्ता किती फुटाचा होणार, या बाबत नागरिक विविध शंका उपस्थित करू लागले आहेत. खामगाव-पंढरपूर मार्गावरील माजलगाव-केज या टप्प्यापैकी शहरातील सिमेंट रस्त्याचे काम महिन्यापासून सुरू आहे. हे काम सुरु झाले तेव्हा पत्रकार व काही सामाजिक संघटनांनी हे काम अडवून नियमानुसार १०० फुटांचे करावे, अशी मागणी केल्यानंतर येथील आ. आर. टी. देशमुख यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर नागपूर येथे आ.आर.टी.देशमुख यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली होती. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कानावर ही बाब घातली होती. या नंतर हा रस्ता १०० फुटांचाच होणार असे वाटत होते.
सध्या शहरातील एका बाजूचे काम पूर्ण झाले अजून दुसरी बाजू सुरू करत असताना नाल्यांचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. शहरातील या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासूनच सिमेंटीकरणाचे काम झाल्यानंतर किमान दोन आठवडे तरी बारदाना टाकून पाणी मारणे आवश्यक असताना तसे दिसत नाही. आता कसेकरी काम उरकण्यासाठी कंपनीचा खटाटोप सुरू आहे.
काम झाल्यानंतर पाणी टाकले जात नाही
संबंधित रस्त्याची संपूर्ण जबाबदारी पुढील ६ वर्षे कंपनीकडे आहे त्यामुळे क्युरिंगअभावी रस्ता फुटला तर फुटू द्या, असे बेजबाबदार वक्तव्य कार्यकारी अभियंता विक्र म जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. सदर रस्त्यावर पाण्याची क्युरिंग न केल्याने या रस्त्यावरून वाहने गेल्यास रस्त्यावरील धूळ अनेकांच्या डोळ्यात जात असल्याने डोळ्यांचे आजार जडत आहेत.
सिमेंट रस्त्याच्या क्युरिंगवरून दोन अधिकाऱ्यांत मतभिन्नता
या रस्त्याच्या रु ंदी व क्युरिंगबाबत रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विक्र म जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सिमेंट रस्त्याचे काम झाल्यानंतर किमान दोन आठवडे तरी रस्त्यावर पाणी मारून क्युरिंग करणे आवश्यक आहे जर पाणी मारले जात नसेल तर संबंधित कंपनीला क्युरिंगबाबत सूचना करण्यात येईल, असे सांगितले व हा रस्ता १०० फुटाचाच होणार, असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता जाधव यांनी रस्त्याच्या रूंदीबाबत उपोषणार्थींना दिले होते. तर दुसरीकडे मात्र याच कामावर असणारे शाखा अभियंता अतुल कोटेचा यांना विचारणा केली असता ते म्हणाले, रस्त्याची रु ंदी केवळ ७८ फुटांचीच असून १०० फुटांच्या आतमधील अतिक्र मण होत असल्याचे सांगत क्युरिंगबाबत ते म्हणाले, रस्त्याचे काम सुरू असतानाच मशीनमध्येच रसायनांचा वापर केल्यामुळे त्यास पुन्हा पाणी मारण्याची आवश्यकता नसते, असे सांगितल्याने रस्त्याच्या क्युरिंगबाबत अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता दिसत आहे