'५० हजार नाही तुम्ही ५ लाख घ्या'; बिनव्याजी कर्जाचे आमिष देत तरुणास ९० हजाराला फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 06:50 PM2021-10-05T18:50:17+5:302021-10-05T18:53:12+5:30
Cyber Crime in Beed : सोशल मिडियावर सध्या कर्ज देणाऱ्या अॅपचे मेसेज व्हायरल आहेत. या द्वारे देण्यात येणाऱ्या अमिषाला अनेक तरुण बळी पडत असल्याचे उघडकीस आले आहे.
अंबाजोगाई : ५० हजार रुपये कर्ज काय मागता ? पाच लाख रुपये बिनव्याजी घ्या, अशी बतावणी करत बनावट आर्थिक संस्थेने एका युवकाची तब्बल ९० हजार रुपयांची फसवणूक केली. अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बालासाहेब पवार असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.
सोशल मिडियावर सध्या कर्ज देणाऱ्या अॅपचे मेसेज व्हायरल आहेत. या द्वारे देण्यात येणाऱ्या अमिषाला अनेक तरुण बळी पडत असल्याचे उघडकीस आले आहे. काही आठवड्यात अंबाजोगाईतील रहिवाशी असलेली व मुंबईतील प्रख्यात डॉक्टरची अशाच आमिषामुळे दोन लाखांची फसवणूक झाली होती. याला आठवडा होत नाही तोच अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील बालासाहेब अशोक पवार यांची सायबर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. बाळासाहेब पवार यास धानी लोन बाजार या ग्रुपवरुन निनावी फोन आला. तुम्हाला ५० हजार रुपयाचे कर्ज मंजुर झाले आहे. त्यासाठी २२५०/- प्रोसेसिंग चार्ज भरावा लागेल असे सांगितले.
संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार
तो भरल्यानंतर संबंधित व्यक्तीने तुमचे सिबील खूपच चांगले आहे, त्यामुळे ५० हजारापेक्षा तुम्हाला ५ लाख रुपयांचे कर्ज आमच्या ग्रुपमधून मिळू शकते असे आमिष दाखवले. तसेच तरुणाकडून त्याने टप्याटप्याने ९० हजार ४४० रुपये खात्यातून वर्ग करुन घेतले. हा प्रकार बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी बीडच्या सायबर क्राईमला तक्रार केली. परंतु, संबंधित व्यक्तीने ही रक्कम दुसर्याच्या खात्यावर वर्ग केलेली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी बर्दापूर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
भरधाव वाहनाने पादचारी तरुणास चिरडले; गढी-माजलगाव रोडवरील घटना