ऊसतोडणी कारणीभूत नव्हे; सुविधांच्या अभावामुळेच काढल्या गर्भपिशव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 07:00 PM2019-08-30T19:00:20+5:302019-08-30T19:08:37+5:30
बीड जिल्ह्यात ऊसतोडणीला जाण्यासाठी महिला गर्भपिशव्या काढत असल्याची माहिती समोर आली होती.
- सोमनाथ खताळ
बीड : ऊसतोड मजूर महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकरणाला ऊसतोडणी नव्हे तर सुविधांचा अभाव कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. साखर कारखान्यांकडून जादा काम करून घेणे, साखर आयुक्त आणि कामगार विभागाने त्याकडे दुर्लक्ष करणे हेच यास जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभाग, साखर आयुक्त, कामगार आयुक्त, महिला व बालकल्याण, पुरवठा विभागाशी निगडित विविध अशा ३२ शिफारशी समितीने आरोग्य मंत्र्यांसमोर सादर केल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
बीड जिल्ह्यात ऊसतोडणीला जाण्यासाठी महिला गर्भपिशव्या काढत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर याच्या चौकशीसाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांच्या अध्यक्षतेखाली २६ जून २०१९ रोजी समिती नियूक्त केली. या समितीने दोन महिने अभ्यास करून उसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या का काढल्या, याच्या कारणांसहित त्यांना काय सुविधा देणे अपेक्षित आहे, याच्या शिफारशी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहेत.
यामध्ये साखर कारखाने व आयुक्त, कामगार आयुक्त, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, पुरवठा विभागाशी संबंधित सर्व ३२ शिफारशी आणि काही सूचना करण्यात आल्या आहेत.दरम्यान, कारखान्याला गेल्यावर महिलांकडून जादा काम करून घेतले. त्या ठिकाणी अस्वच्छता, वेळेवर जेवण नसणे, राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव, स्नानव्यवस्था इ. किरकोळ परंतु त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना विविध आजारांची लागण होते. यामुळेच मग त्यांना गर्भपिशवी शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
१३ हजार गर्भपिशवी शस्त्रक्रिया समितीच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी जिल्ह्यातील ८२ हजार ३०९ महिलांचे सर्वेक्षण केले. पैकी १३ हजार ८६१ महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया काढल्याचे समोर आले आहे. याच्या कारणांसह अहवाल आरोग्य मंत्र्यांना सादर केलेला आहे.
‘त्या’ रुग्णालयांवर होणार कारवाई?
गर्भपिशवी शस्त्रक्रिया करायची असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांच्या परवानगीसह मार्गदर्शक सूचना बंधनकारक केलेल्या आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी महिलांच्या मनात भीती घालून आणि गरज नसताना शस्त्रक्रिया केल्या आहेत, त्यांची चौकशी सुरूच आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. १३ हजारपैकी निम्म्याहून आधिक शस्त्रक्रिया या केवळ १० खाजगी रुग्णालयांमध्ये झालेल्या आहेत.
या कारणांमुळे झाल्या शस्त्रक्रिया
१३ हजार ८६१ पैकी ५ हजार ६६९ शस्त्रक्रिया या अतिरक्त स्त्रावामुळे करण्यात आल्या. त्यानंतर पोटात दुखणे - ३१८७, पांढरे जाणे - २०२४, गर्भपिशवीला गाठ होणे - १००४, जंतूसंसर्ग- ७७७, अॅडिनोमायसिस - ३०१, अंग बाहेर पडणे - २५२, गर्भपिशवीच्या मुखाला सूज येणे - २०४, गर्भपिशवीच्या अस्राला सूज येणे - ७२, गर्भपिशवी मोठी होणे - २६, गर्भपिशवीचा कर्करोग - २१, अतिरक्तस्त्रामुळे प्रसूतीवेळी गर्भपिशवी काढणे - २१, अंडाशयाला गाठ येणे - १८, पू तयार होणे - १५, गर्भपिशवी मुखाचा कर्करोग - ६, अंडाशयाचा कर्करोग - १, इतर कारणे - २६३ अशा कारणांमुळे शस्त्रक्रिया झाल्याचा अहवाल आहे.
वयोमानानुसार शस्त्रक्रिया
२५ वर्षांपर्यंत ५८८
२६-३० २१३१
३१-३५ ३०३४
३६-४० ३३२३
४१-५० ३७५३
५१-६० ८२५
६१ वर्षानंतर २०७
एकूण १३८६१
तालुकानिहाय शस्त्रक्रिया
तालुका शस्त्रक्रिया सर्वेक्षण
गेवराई २९९८ १६९६५
शिरुर २९१९ ९३८८
बीड १६३९ ८७७७
केज १२६४ ७२५८
धारुर ११५९ ७४४९
वडवणी ९९३ ५१८८
माजलगाव ७७५ ८२५२
परळी ७३२ ५७१९
आष्टी ६८७ ४४५७
पाटोदा ३७० ५४३३
अंबाजोगाई ३२५ ३४२३
एकूण १३८६१ ८२३०९