‘संशयाने नव्हे तर विश्वासानेच पुढे जावे लागेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:31 PM2019-07-24T23:31:23+5:302019-07-24T23:33:11+5:30
भारतीय समाज हा विविधतेने जगणारा आहे. देशाचे, समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर या विविधता जपत संशयाने नव्हे तर एकमेकांप्रती विश्वासानेच पुढे जावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
बीड : भारतीय समाज हा विविधतेने जगणारा आहे. देशाचे, समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर या विविधता जपत संशयाने नव्हे तर एकमेकांप्रती विश्वासानेच पुढे जावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. बीडकरांच्या वतीने डॉ. आ. ह. साळुंखेंचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गौरव करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
आ. ह. म्हणाले, भारतीय समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर एकमेकांचा आदर करणारी, संवाद साधू शकणारी प्रवृत्ती जपली पाहिजे, टिकवली पाहिजे. हीच आपली खरी संस्कृती आहे. त्यातूनच भारतीय समाज पुढे जाईल. सर्व महामानवांनी याच प्रेरणा दिल्यात. सामाजिक जीवनात संशयाने नव्हे तर विश्वासाने, द्वेषाने नव्हे तर स्नेहाने जोडणे आवश्यक. चार्वाक, बुध्द, तुकाराम, ज्ञानेश्वर, फुले, शाहू, आंबेडकर यांच्याकडून हे शिकत आलोय. हाच आपला खरा वारसाय. म्हणून आपण संघर्षाच्या मार्गाने जायचे की स्नेहाच्या, हे ठरवावे लागेल असे आ. ह. म्हणाले.
चार्वाकांनी स्वातंत्र्य हाच मोक्ष असे सांगितले. म्हणूनच स्वतंत्रपणे विचार करण्याची मानसिकता रुजली पाहिजे. स्त्रियांच्या मनात धर्माच्या आणि परंपरेच्या नावावर एक भीती पेरली आहे, त्यातून निर्भयतेचे पीक कसे येईल? म्हणून माणसाने आपला स्वातंत्र्याचा अधिकार वापरणे मला नेहमी महत्वाचे वाटले आहे. वर्षानुवर्षे पिढयनपिढया काही लोकांनी धर्म, निती सांगितली. ज्ञानाची, संपत्तीची साधनं स्वत:च्या हातात ठेवली आणि इतरांनी डोके चालवू नये, फक्त कष्ट करावेत असे सांगितले. समाजातील ९०% लोकांच्या बाबतीत हेच झाल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक बी. बी. जाधव, तर डॉ.बाळासाहेब पिंगळे यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन संजय मालाणी यांनी केले. आभार मोहन जाधव यांनी मानले.
जिज्ञासा टोकाची हवी
जागतिकीकरणाबद्दल अनेक आक्षेप आहेतच पण जागतिकीकरणाने तरुणाईसाठी जगाची दारे उघडली आहेत, मात्र त्यासाठी व्यासंग आणि जिज्ञासा तितकीच टोकाची असावी लागते. जिज्ञासा असेपर्यंतच माणूस जिवंत असतो असेही त्यांनी
सांगितले. यावेळी नागरिक उपस्थित होते.