पाच वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या पुलाची साधी डागडुजीदेखील नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:22 AM2021-06-29T04:22:55+5:302021-06-29T04:22:55+5:30
घाटनांदूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेलेल्या घोलपवाडी, चोथेवाडी, लिंबगाव, बर्दापूर या रोडवरील घोलपवाडीजवळील रेणा नदीवरील नळकांडी पूल ...
घाटनांदूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेलेल्या घोलपवाडी, चोथेवाडी, लिंबगाव, बर्दापूर या रोडवरील घोलपवाडीजवळील रेणा नदीवरील नळकांडी पूल जून २०१६ मध्ये वाहून गेला. याला तब्बल पाच वर्षे होत आली, मात्र अद्यापही त्या पुलाची नव्याने उभारणी तर सोडाच, साध्या डागडुजीकडेही कोणी लक्ष दिलेले नाही.
घाटनांदूर व परिसरातील बहुसंख्य व्यापारी, शेतकऱ्यांचा खरेदी तसेच शेतीमाल विक्रीच्यादृष्टीने लातूर येथील बाजारपेठेशी दररोज संपर्क येतो. या रोडवरून लातूर येथून घाटनांदूर येथे बसच्या दोन फेऱ्या, तर परळी डेपोच्या जाणाऱ्या लातूर दोन फेऱ्या, बर्दापूर दोन फेऱ्या अशा बसेस चालतात. खराब रस्त्यामुळे अनेकदा या बसेस बंद ठेवल्या जातात. घाटनांदूर व परिसरातील व्यापारी, दवाखान्यात जाणारे आजारी व्यक्तींना जवळचा मार्ग म्हणजे घोलपवाडी, चोथेवाडी, लिंबगाव, बर्दापूर, लातूर असा आहे. मात्र हा मार्ग कंत्राटदार मंडळींनी पूर्णपणे पोखरला असून पाच वर्षांपूर्वी जूनमध्ये या रोडवरील घोलपवाडी परिसरातील रेणा नदीवरील नळकांडी पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूर्णपणे भिंतीसह वाहून गेला व सिमेंट पाईपही तुटून वेगळी झाली. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागत आहे. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा असला तरीही या रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमार दर्जाचे डांबरीकरण करून मलिदा लाटला आहे. तसेच या रोडवर पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत कोटयवधी रुपयांची कामे झाली आहेत. तरीही हा रस्ता दोन ते तीन फूट खोलीचे खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी घातकच आहे. लातूरला जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर वाहनधारक करतात. या रोडमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मालाची नासधूस होत आहे. तब्बल पाच वर्षे होत आहेत, मात्र घोलपवाडीजवळच्या पुलाकडे लक्ष देण्यास कोणतीही यंत्रणा तयार नसल्याचे दिसते. या पुलाची तात्काळ डागडुजी न करता नव्याने उभारणी करावी, अन्यथा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागेल, असा इशारा अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ॲड. इंद्रजित निळे व सेवा सहकारी सोसायटी चोथेवाडीचे संचालक बाबूराव जाधव यांनी दिला आहे .
===Photopath===
280621\screenshot_20200226-171455.jpg
===Caption===
घाटनांदूर घोलपवाडी चोथेवाडी बर्दापूर रस्ता पुल वाहुन जावून पाच वर्ष झाले .