बाराही महिने नदी पार करण्याची कसरत, पावसाळ्यात ३ महिने बुडते शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 10:28 AM2022-09-22T10:28:57+5:302022-09-22T10:29:54+5:30
तीन महिने बुडते शाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन कधी गुडघाभर, कधी कमरेइतक्या तर कधी गळ्यापर्यंत पाण्यातून जीवघेणी कसरत करीत विद्यार्थ्यांना शाळेची वाट धरावी लागते. पावसाळा असो किंवा नसो नदीतून जावेच लागते. अशी भयंकर स्थिती बीडमधील चौसाळ्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या हिंगणी, मुंडे वस्ती आणि आंधळे वस्तीवरील शाळकरी मुलांची आहे. एक पूल बांधला तर ही समस्या मिटू शकेल; परंतु आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडल्यानंतरही समस्या अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही.
हिंगणी खुर्द गावाशेजारून मांजरा नदी गेली आहे. मांजरा नदीच्या पलीकडे मुंडे वस्ती आणि आंधळे वस्ती या दोन वस्त्या असून, येथील सर्व नागरिकांना दैनंदिन कामकाज, मुलांचे शिक्षण, आदी मूलभूत गरजांसाठी हिंगणी खुर्दमध्ये यावे लागते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हिंगणी व पुढील शिक्षणासाठी चौसाळ्याला जावे लागते. नदीतून जाण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नाही.
तीन महिने बुडते शाळा
मांजरा नदीवर पूल नसल्याने मुंडे वस्ती आणि आंधळे वस्ती येथे राहणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना किमान तीन महिने शाळेत जाता येत नाही. त्यामुळे त्यांचे कायम शैक्षणिक नुकसान होते.
दुर्घटनेची भीती
n पाठीवर दप्तरासह पाण्यातून जाताना लहान मुलांना इतर विद्यार्थी खांद्यावर किंवा डोक्यावरून नेतात.
n नदीपात्रात जास्त पाणी असले तर धडकी भरते, यातूनही वाट काढण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे.
n तीन वर्षांपूर्वी अशीच वाट काढणारा एक विद्यार्थी तीन किलोमीटरपर्यंत वाहून गेला होता.