पीकविमा न भरता 'ऑलरेडी इन्शुअर्ड'ची सूचना; अनेक शेतकरी राहणार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 01:18 PM2021-07-22T13:18:17+5:302021-07-22T13:19:26+5:30
crop insurance : यापूर्वी एकाच क्षेत्रावर अनेक वेळा पीकविमा उचलला असल्याचे प्रकार झाल्यामुळे विमा कंपन्यांनी ऑनलाईन पीकविमा भरून घेण्यास सुरुवात केली आहे.
उजनी (जि. बीड) : प्रधानमंत्री फसला बिमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना २३ जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मात्र, पीकविम्याचा फॉर्म भरण्यासाठी जनसेवा केंद्रावर गेल्यावर काही शेतकऱ्यांना वेगळाच अनुभव येतो आहे. पीकविमा भरलेला नसतानाही 'ऑलरेडी इन्शुअर्ड'ची सूचना मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
यापूर्वी एकाच क्षेत्रावर अनेक वेळा पीकविमा उचलला असल्याचे प्रकार झाल्यामुळे विमा कंपन्यांनी ऑनलाईन पीकविमा भरून घेण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन विमा भरत असताना शेतकऱ्यांचे शिवारानुसार गट क्रमांक आणि खाते क्रमांक टाकल्यानंतर संबंधित जमीन क्षेत्राची माहिती ऑनलाईन दाखवली जाते. एका क्षेत्रावर एकदाच पीकविमा भरून घेतला जातो. मात्र, यावर्षीचा पीकविमा भरला नसताना पोर्टलवर पीकविम्यासाठी शिवार, पेरणीची तारीख, गट क्रमांक, खाते क्रमांक ही माहिती भरत असताना अगोदरच पीकविमा भरला असल्याची सूचना येत असून, माहिती अपलोड करण्यात अडचण येत आहे. संबंधित क्षेत्रावर पीकविमा अगोदरच भरला आहे. असे दाखवत असल्याने अशा क्षेत्रातील पीकविमा भरण्यास अडचण येत असून, अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार आहेत.
पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार
यावर्षीचा खरीप हंगाममधील पिकांचा विमा भरणे सुरू आहे म्हणून पीकविमा भरण्यासाठी गेलो असता शेतीसंबंधी माहिती भरल्यावर अगोदरच पीकविमा भरल्याचे केंद्रचालक सांगत आहेत. मात्र, मी यावर्षी पीकविमा भरलेला नाही. पीकविमा भरून घेत नसल्याने माझ्यासारखे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार आहेत.
- मंचक नागोराव कातकडे, शेतकरी, कातकरवाडी.