घाटनांदूरच्या डॉक्टरला नोटीस; कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:22+5:302021-04-14T04:30:22+5:30
रूग्ण पळविणे येणार अंगलट : तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश बीड : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर आरोग्य केंद्रातील ...
रूग्ण पळविणे येणार अंगलट : तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास घोळवे यांनी औषधी नाहीत असे सांगून आपल्या खाजगी क्लिनीकमध्ये रूग्ण पळवत आर्थिक लूट केली होती. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल झाली. हा प्रकार ''''लोकमत''''ने समोर आणताच सोमवारी डॉ.घोळवेला नोटीस बजावण्यात आली. तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
घाटनांदूर आरोग्य केंद्राचे काम राज्यात अव्वल आहे. जिल्ह्याची ओळखही त्यांनी राज्यात उंचावली. येथे डॉ.ज्ञानेश्वर मुंडे व डॉ.विलास घोळवे हे दोन वैद्यकीय अधिकारी येथे कर्तव्य बजावतात. परंतु येथील डॉ.घोळवे हे आरोग्य केंद्रातील रूग्णांची पळवापळवी करतात. खाजगी क्लिनीकमध्ये नेऊन त्यांच्याकडून आर्थिक लूट करतात. संरक्षण भिंत तोडून रूग्णांना ये जा करण्यासाठी रस्ताही केल्याचे सांगितले जात आहे. तसे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याही निदर्शनास हा प्रकार आला होता. यावर ही संरक्षण भिंत दुरूस्तीच्या सुचनाही कुंभार यांनी दिल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला डॉ.घोळवे विरोधातील तक्रारीची गंभीर दखल घेत त्यांना सोमवारी नोटीस बजावण्यात आली आहे. आता यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार काय करवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
कोरोनाकाळात सरकारीतील रूग्ण वाऱ्यावर
जिल्ह्यातील काही आरोग्य केंद्रासह ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर प्रामाणिक कर्तव्य बजावून सामान्यांना सेवा देत आहेत. परंतू काही डॉक्टर हे हजेरी लावायलाही रूग्णालयात येत नाहीत. सरकारीत कधी तरी जावून आपले खाजगी व्यवसाय जोरात सुरू ठेवतात. याकडे संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्याकडून योग्य कारवाई झाल्यास याला आळा बसेल, असा विश्वास आहे. सरकारीतील रूग्ण वाऱ्यावर सोडणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.