अवैध वाळू प्रकरणी गेवराईच्या तहसिलदाराला नोटीस, लोकमतच्या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
By शिरीष शिंदे | Published: January 25, 2023 11:34 PM2023-01-25T23:34:31+5:302023-01-25T23:35:41+5:30
जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिलेल्या नोटीसमध्ये लोकमतच्या बातमीचा उल्लेख असून इतर गंभीरबाबींचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.
बीड : गेवराई तालुक्यात महसूल पथकाने अडीज महिन्यांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेल्या दोन हायवांवर १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. चालकांविरुद्ध फिर्याद देत मालकांना मोकळे सोडले. या आधारावर "तस्करी वाळूची, गुन्हा फक्त चोरीचा, कलमाला फाटा" या मथळ्याखाली २० जानेवारी रोजी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांना लेखी खुलासा करण्यासंदर्भाने नोटीस बजावली आहे.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिलेल्या नोटीसमध्ये लोकमतच्या बातमीचा उल्लेख असून इतर गंभीरबाबींचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. सदरील नोटीशीनुसार, अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणात कारवाई व नियंत्रण ठेवण्यात येत नसल्यामुळे गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन व वाहतुकीच्या घटना निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या कोणत्याही शासन निर्णयान्वये कारवाई होत नसल्याचे निदर्शनात येत आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीच्या प्रकरणामध्ये जाणुनबुजून निष्काळजीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. ही अत्यंत खेद जनक बाब असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणात कारवाई होत नसल्यामुळे गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन व वाळू वाहतुकीचे प्रकार निदर्शनास येत आहेत. मागील १५ दिवसात जिल्हास्तरीय पथकाकडून अंदाजे १५०० ते २००० ब्रास वाळू गेवराई तालुक्यात जप्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असल्याची आपणास कल्पना नसणे ही नक्कीच संशायास्पद आहे. जिल्हास्तरीय पथकाकडून राक्षसभुवन येथे ७५० ब्रास जप्त वाळू चोरी जाईपर्यंत आपण कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे शासनाने आर्थिक नुकसान झाले आहे. ही निश्चितच आपली जबाबदारी आहे.
शासकीय कामात जाणून-बुजून निष्काळजीपणा करत असून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत. सदरील वर्तन हे अत्यंत बेजबाबदारपणाचे असून आदेशाचा अवमान करणारे आहे. शासकीय कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष हे गंभीर स्वरुपाचे आहे. आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करु नये ? याचा लेखी खुलासा सादर करावा असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी गेवराईचे तहसिलदार खाडे यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.