पाकिस्तानात जाण्याच्या तयारीतील कुख्यात गुंडाच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:37 PM2019-10-09T23:37:53+5:302019-10-09T23:39:20+5:30
बीड : कानून के हाथ लंबे होते है हे आपण नेहमी ऐकतो. परंतु त्याचा प्रत्यय बीड पोलीस दलाने दिला ...
बीड : कानून के हाथ लंबे होते है हे आपण नेहमी ऐकतो. परंतु त्याचा प्रत्यय बीड पोलीस दलाने दिला आहे. शिक्षक सय्यद साजेद अली अन्सार हत्या प्रकरणातील मास्टरमार्इंड गुज्जर खान याला परराज्यात व जिल्ह्यात पाळत ठेवून मंगळवारी अटक केली आहे. गुज्जर खान हा पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच त्याच्या दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुसक्या आवळल्या, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील बालेपीर परिसरात शिक्षक सय्यद साजेद अली अन्सार यांचा १९ सप्टेंबर रोजी धारदार शस्त्राने खून करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील ११ आरोपींना एका आठवड्यात दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच शिवाजीनगर पोलिसांनी हैदराबाद व इतर जिल्ह्यातून अटक केली होती. याचवेळी हैदराबाद येथे गुज्जर हा असल्याची खात्रीलायक माहिती दरोडा प्रतिबंधक पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव, संदीप साळवे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांचे पथक तेथे पोहचले. एका घरात गुज्जर याचा भाचा, या प्रकरणातील आरोपी नासेर हा लपल्याची माहिती होती. पोलीस पाळतीवर असल्याची कुणकुण लागताच नासेरने तेथून पळ काढला.
दरम्यान, जाधव यांनी हैदराबाद शहरात नासेर याचा सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक केली. परंतु त्याचवेळी गुज्जर हा मेट्रोच्या सहाय्याने हैदराबाद येथून दिल्लीला गेला. यावेळी पोलिसांना हुलकावणी देत फरार होण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर देखील पोलिसांचे पथक त्याच्या पाळतीवर होते. याच दरम्यान गुजर हा दिल्लीवरुन पाकिस्तानला जाण्याच्या विचारात होता. त्या पध्दतीने तो राजस्थानातील अजमेर, माऊंट अबू, म्हैसाणा आणि गुजरातमधील अहमदाबाद आला व या मार्गे तो पाकिस्तानला जाण्याची लिंक लागते का याची विचारपूस केली. त्यानंतर भांडूप येथे त्याने काही सेकंदांसाठी सीमकार्ड मोबाईलमध्ये टाकले. याच दरम्यान दरोडा प्रतिबंधक पथकाला त्याची खबर लागली. परंतु गुज्जरकडे पाकिस्तानला जाण्यासाठी लागणारे पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे तो तेथून पुण्याला आला. त्यावेळी देखील पोलीस त्याच्या मागावर होते. पैसे घेण्यासाठी तो बीडला आल्याची खात्रीशीर माहिती दरोडा प्रतिबंधक व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सापळा रचत मंगळवारी गुज्जर याला बीड शहरामधून अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा, दोन राऊंड जप्त केले. त्याला शिवाजीनगर पोलिसांकडे स्वाधीन केले. गुज्जरला न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे, उप अधीक्षक भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पो. नि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव, सपोनि संदीप साळवे, पो. क़ मनोज वाघ, अशोक दुबाले, राहुल शिंदे, महेश भागवत, संतोष म्हेत्रे, शेख आसेफ, चालक नारायण साबळे यांनी केली.
चार हजार किलोमीटर केला प्रवास
शिक्षक खून प्रकरणातील काही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मास्टरमार्इंड गुज्जर खान याच्या पाळतीवर पोलिसांची पथके होती.
यावेळी हैदराबाद, दिल्ली, गुजरात, राजस्थान अशा चार राज्यात चार दिवसात चार हजार किलोमीटरचा प्रवास दरोडा प्रतिबंधक पथकाने केला व गुज्जरला अटक केली.
गुज्जर खानवर मोक्का अंतर्गत होणार कारवाई
काही महिन्यापूर्वी एका भंगारच्या व्यापाºयाला खंडणी मागितली होती. तसेच त्याच्या घरावर पेट्रोल टाकून हल्ला केला होता. याप्रकरणी बीड ग्रामीण व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुज्जर व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुज्जरवर विविध प्रकारचे २६ गुन्हे दाखल असून, त्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील प्रस्तावित आहे.