कुख्यात दरोडेखोर आटल्या भोसलेच्या आष्टी पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
By सोमनाथ खताळ | Published: August 14, 2023 08:08 AM2023-08-14T08:08:06+5:302023-08-14T08:09:20+5:30
दरोड्याच्या तयारीत होता; पिस्टल, धारदार शस्त्रसहजेरबंद
- नितीन कांबळे
कडा- हद्दीसह इतर जिल्ह्यात चोरी,घरफोडी, खुनासह दरोडा,यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांना अनेक वर्षांपासून गुंगारा देत ताकतीच्या बळावर दहशत निर्माण करत फिरत होता. रविवारी रात्री ११ च्या दरम्यान आष्टी पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर आटल्या ईश्वर भोसले वय वर्ष ३२ याच्या मुसक्या आवळल्या.
कर्जत तालुक्यातील बेलगांव येथील रहवाशी आटल्या ईश्वर भोसले वय वर्ष ३२ हा सराईत गुन्हेगार असून आष्टीसह अहमदनगर, पुणे,बीड,सोलापुर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा,यासह अनेक जिल्ह्यात घरफोडी,खुनासह दरोडा,जबरी घरफोडी, यात तो मास्टर माईट होता. मागील चार वर्षापासून तो पोलिसांना हवा होता. अंगाने आडदांड असलेला आटल्या ताकतीच्या जोरावर गंभीर स्वरूपाच्या घरफोड्या करायचा. या अगोदर त्याच्यावर दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.अल्पवयीन असल्याने त्याला पुणे येथील बालसुधारगृहात ठेवले होते.पण तिथून तो पळाला होता.आष्टीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सय्यद शौकतअली यांनी त्याला २०१८ साली श्रीगोंदा तालुक्यातुन जेरबंद केले होते.त्यानंतर काही दिवसांनी तो परत पसार झाला.
मागील चार वर्षापासून तो पोलिसांना सारखा गुंगारा देत असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. रविवारी रात्री ११ च्या दरम्यान आटल्या आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत आसल्याची गोपनीय माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना मिळताच त्यांनी ठाण्यातील सहकारी सोबत घेऊन सापळा लावून रात्री उशिरा त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस नाईक प्रवीण क्षीरसागर, पोलीस नाईक हनुमंत बांगर,पोलीस शिपाई मजहर सय्यद, दिपक भोजे, दंगल नियंत्रण पथकातील जवान,याच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
दरोड्याच्या तयारीत आलेला आटल्या पोलिसांनी गटवला.
आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारी आलेल्या आटल्याला आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला गटवल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
पिस्टलसह घातक शस्त्रासह जेरबंद
पोलिसांनी सापळा लावून आटल्याला पकडले त्यावेळी त्याच्या कबरेला पिस्टल, व जवळ घातक शस्त्र आढळून आले.त्याच्यावर १५० गुन्हे विविध ठिकाणी दाखल असुन ६० गुन्ह्यात तो फरार होता. पोलिसांनी जिवाची बाजी लावत त्याला शस्त्रासह अटक केली असल्याचे आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी लोकमतला सांगितले.