आता लाल परीतून बिनधास्त प्रवास करा, कोरोनाला घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:41 AM2021-09-16T04:41:57+5:302021-09-16T04:41:57+5:30

बीड : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असली तरी, एसटी बसने प्रवास करताना अनेकजण विचार करत आहेत. कोरोनाचा फटका ...

Now travel safely through the red, don't be afraid of Corona | आता लाल परीतून बिनधास्त प्रवास करा, कोरोनाला घाबरू नका

आता लाल परीतून बिनधास्त प्रवास करा, कोरोनाला घाबरू नका

Next

बीड : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असली तरी, एसटी बसने प्रवास करताना अनेकजण विचार करत आहेत. कोरोनाचा फटका बसलेल्या राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे कोरोनाचा व्हायरस नष्ट होऊन धोका टळणार असून, प्रवाशांना विनाचिंता प्रवास करणे सुलभ होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून दीड वर्षाच्या कालावधीत बससेवा बंद ठेवण्याची वेळ महामंडळावर आली होती. त्यामुळे बीड विभागातील सर्वच ८ आगारांना आर्थिक फटका बसला होता. आधी ५० टक्के प्रवासी क्षमतेने, तर नंतर शंभर टक्के क्षमतेने बससेवा सुरू केली. परंतु कोरोनाचे दडपण कायम होते. त्यामुळे गर्दीत प्रवास नको, म्हणून खासगी वाहनांचा आधार अनेकजण घेत होते. मात्र सर्वसामान्य प्रवासी अशी व्यवस्था करू शकत नव्हते. त्यामुळे अनलॉकचे सुरुवातीचे काही दिवस सोडल्यास, नंतर लाल परी पूर्वपदावर येऊ लागली. काही आगारातील बस फेऱ्यांनी विक्रमी उच्चांक गाठला.

बससेवा सुरळीत राहण्यासाठी तसेच प्रवासी वाढविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ कात टाकत आहे. बसेसना जीपीएस व्हेईकल ट्रेकिंग सिस्टिम लावून स्थानकावर प्रवाशांना माहिती उपलब्ध करून देण्याचा, तसेच प्रवाशांना ॲपद्वारे बसची माहिती मिळावी म्हणून सुविधा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातच आता बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले जात आहे. यामुळे कोरोनाला प्रतिबंध होणार असून मनात कोणतीही भीती न बाळगता प्रवास करणे सुलभ होणार आहे.

--------------

कोविड - १९ च्या प्रतिबंधक नियमावलीनुसार सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेतील बस दररोज सॅनिटाईज करावी लागते. मात्र आता ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केल्याने बसमधील आसन, आसनावरील लोखंडी पाईप, सेंटर पाईप, खिडकी अथवा कोठेही प्रवाशांनी स्पर्श केला तरी, कोटिंगमधील रसायनांमुळे व्हायरसचे संक्रमण होणार नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित होऊ शकेल, असे सांगण्यात आले.

-------------

कोटिंगचा दोन महिने प्रभाव

रापमच्या बीड विभागात ३२४ बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करणे सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी मास्क व इतर काळजी घेत आहेत. ॲन्टिमायक्रोबियल कोटिंगमुळे व्हायरसचे संक्रमण रोखता येणार आहे. एकदा कोटिंग केले, तर त्याचा दोन महिने प्रभाव टिकून राहतो. त्यामुळे दररोजचे सॅनिटायझेशन करावे लागणार नाही. प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.

- अजयकुमार मोरे, विभाग नियंत्रक, रापम, बीड.

--------

विभागात ५१८ बसेस

बीड विभागातील आठ आगारांतील एकूण ५१८ पैकी २७४ साध्या बसेस, १२ शिवशाही, १६ सेमी लक्झरी व २२ स्लीपर सीटर अशा ३२४ बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Now travel safely through the red, don't be afraid of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.