आता आठवड्यातून पाच दिवस कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:44+5:302021-01-25T04:34:44+5:30
बीड : कोरोना लसीकरणाला आता आरोग्य विभागाने गती दिली आहे. अगाेदर पाच केंद्र होते. आता त्यात आणखी धारूर, माजलगाव, ...
बीड : कोरोना लसीकरणाला आता आरोग्य विभागाने गती दिली आहे. अगाेदर पाच केंद्र होते. आता त्यात आणखी धारूर, माजलगाव, पाटोदा, केज अशी चार केंद्रेही वाढविण्यात आली आहेत तसेच आठवड्यातून केवळ रविवार आणि मंगळवारवगळता इतर पाचही दिवशी ही मोहीम सुरू राहणार आहे. दररोज ९०० लाभार्थ्यांना लस टोचली जाणार आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आष्टी, अंबाजोगाई, बीड, गेवराई व परळी या पाच केंद्रांवरून आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत होती. त्यात प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे दररोज ५०० लाभार्थी होत असत. आता लसीकरणाचा वेग वाढविण्यात येणार असून सोमवारपासून केज, माजलगाव, पाटोदा व धारुर येथेही लसीकरण केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली. तसेच केवळ मंगळवार व रविवारवगळता इतर पाचही दिवस हे लसीकरण केले जाणार आहे. आता जिल्ह्यात ९ केंद्रे झाली असून दररोज ९०० लाभार्थींचे उद्दिष्ट असणार आहे.
लक्षणे आढळल्यानंतर घाबरू नये
लस घेतल्यानंतर १० टक्के लाभार्थ्यांना इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी सूज येणे, अंगदुखी, खाज येणे, मळमळ, डोकेदुखी, थकवा व थंडीताप येणे असा त्रास होऊ शकतो तर १० टक्के लोकांना इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी गाठ येणे, उलट्या होणे, ताप, सर्दी अशी लक्षणे आढळू शकतात. याशिवाय शंभर रुग्णांमागे एकाची भूक मंदावू शकते, घाम येणे, खाज येणे असा त्रास होऊ शकतो, असे डॉ. संजय कदम यांनी सांगितले.