आता शाळांमध्ये वाजणार 'वॉटर बेल'; विद्यार्थ्यांना डब्बा खाण्यासोबतच मिळणार पाणी पिण्यासाठीही सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:07 PM2020-01-22T12:07:03+5:302020-01-22T12:13:18+5:30
राज्यातील सर्व शाळांमध्ये 'वॉटर बेल' उपक्रमाला होणार सुरवात
- नितीन कांबळे
कडा : राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. शरीरात आवश्यक तेवढे पाणी न प्यायल्यामुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी आता शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये आता शाळेच्या वेळात तीन वेळेस 'वॉटर बेल' वाजणार आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांना पाणी पिणे आणि शौचालय वापर करता येणार आहे.
मुलांनी सर्वसाधारणपणे दीड ते दोन लीटर पाणी प्यावयास हवे जे प्रमाण वय, उंची आणि वजनानुसार बदलते. बऱ्याच पालकांची तक्रार असते की, घरून भरून नेलेली पाण्याची बाटली मुलं तशीच घरी परत आणतात. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये 'वॉटर बेल' उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सराटेवडगांव येथील जिल्हा परिषद शाळेने केली असून याचे सर्व प्रथम वृत्त लोकमतने प्रकाशित केली होती.
शाळेत असतानाच्या वेळेत पाणी कमी प्यायल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे मुलांमध्ये थकवा येणे, मूत्रमार्गात संसर्ग, मुतखडा (किडणी स्टोन), चिडचिडेपणा वाढणे आदी आजार दिसून येत आहेत. शाळेतील मुले अभ्यासाच्या आणि खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचे विसरून जातात. तेव्हा पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी घंटा वाजविण्याचा उपक्रमा अंतर्गत शाळेच्या वेळापत्रकात तीन वेळा घंटा वाजविण्याबाबत मुख्याध्यापकानी वेळ निश्चित करावी. त्यामुळे या राखीव वेळेत मुलांना आवश्यकतेनुसार पाणी पिता येईल. परिणामी त्यांची पाणी पिण्याविषयीची मानसिकता तयार होईल व पुढे ती सवय होईल. तसेच या वेळेत मुलांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभा देण्यात यावी. त्याकरीता 'वॉटर बेल' हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात यावा. या बाबतचा अहवाल आयुक्त (शिक्षण) यांनी सर्व शाळांकडून घ्यावा. असे शासन परिपत्रक महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने काढले आहेत.
बीड जिल्ह्यात झाली सर्वप्रथम सुरुवात
आष्टी तालुक्यातील सराटेवडगांव येथील जिल्हा परिषद शाळेने सर्व प्रथम केरळ राज्याच्या धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी 'वॉटर बेल' हा उपक्रम सुरू केला होता. याबाबत लोकमतने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर याच धर्तीवर राज्यातील सर्व शाळेत 'वॉटर बेल' उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे परिपत्रक राज्य सरकारने आता काढले आहे.