बीड पोलिसांचा १०० क्रमांक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:27 AM2017-12-04T00:27:02+5:302017-12-04T00:27:51+5:30
कुठलीही घटना घडली किंवा गुन्हा घडताना दिसला की सामान्य माणूस तातडीने पोलिसांचा १०० क्रमांक डायल करतो. परंतु मागील अनेक दिवसांपासून बीड पोलिसांचा १०० हा क्रमांक बंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कुठलीही घटना घडली किंवा गुन्हा घडताना दिसला की सामान्य माणूस तातडीने पोलिसांचा १०० क्रमांक डायल करतो. परंतु मागील अनेक दिवसांपासून बीड पोलिसांचा १०० हा क्रमांक बंद आहे. विशेष म्हणजे दूरध्वनी कंपनीकडे बिल भरूनही फोन सुरू केला जात नसल्याचे समोर आले आहे. हा क्रमांक बंद असल्यामुळे परिसिरात घडलेल्या घटना, गुन्हे माहिती असूनही देता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आपल्यापैकी अनेकांना १००, १०१, १०३, १०८ हे फोन नंबर परिचयाचे असतात. पोलीस, फायर ब्रिगेड, रेल्वे, अॅम्ब्युलन्स, आप्तकालीन मदत कक्ष यांचे हे क्रमांक आहेत. विविध घटनांची माहिती देण्यासाठी सर्वसामान्य लोक या क्रमांकावर संपर्क साधतात. नागरिकांकडून येणारी माहिती पोलिसांना पोहोचवण्यासाठी हा महत्त्वाचा दुवा आहे. ही सेवा २४ तास सुरू असते. हा क्रमांक कंट्रोल रूममध्ये जोडलेला असतो. कंट्रोलरूम हे पोलीस दलाचे दळणवळणाचे साधनच असते. परंतु मागील अनेक दिवसांपासून हा क्रमांक बंद असल्याने हे दळणवळण (फोन येणे-जाणे) बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह पोलिसांनाही अडचण निर्माण झाली आहे. हा क्रमांक सुरू करावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.
पोलीस ठाण्यांचे फोन बंदच
जिल्ह्यातील निम्याहून अधिक पोलीस ठाण्यांमधील दूरध्वणी (लॅण्डलाईन) बंद आहेत. ग्रामीण भागात तर अधिकारी, कर्मचा-यांची मोबाइल क्रमांक नसल्याने संपर्क साधण्याचे मोठे आव्हान असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठाण्यांसह मदत क्रमांक सुरू करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
फोन सुरू झालेला नाही
संबंधित कंपनीकडे सर्व फोनचे बिल भरलेले आहे. परंतु अद्यापही फोन सुरू झालेला नाही. याबाबत पत्रव्यवहार करून पाठपुरावाही केला आहे, परंतु अद्याप दखल घेतली नाही. जी सेवा मिळते, ती सुद्ध खुप स्लो आहे. लवकरात लवकर क्रमांक सुरू करण्यासाठी कार्यवाही केली जाईल.
- जी.श्रीधर
पोलीस अधीक्षक, बीड