एचआयव्ही बाधितांची संख्या १८१४ वरून २५६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:25 AM2018-12-01T00:25:53+5:302018-12-01T00:26:22+5:30
जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गजन्य रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या घटविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मागील आठ वर्षांमध्ये १८१४ वरून २५६ वर संख्या आली आहे. याची टक्केवारी ५.५ वरुन ०.५६ आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गजन्य रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या घटविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मागील आठ वर्षांमध्ये १८१४ वरून २५६ वर संख्या आली आहे. याची टक्केवारी ५.५ वरुन ०.५६ आहे. आरोग्य विभागाकडून वेळोवेळी होत असलेल्या जनजागृतीमुळे नागरिक एचआयव्हीबद्दल जागरुक झाल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने घेतलेला आढावा.
एचआयव्ही (एक्वायर्ड इम्युनो डेफिशिएन्सी सिंड्रोम) या संसर्गजन्य आजाराचे नाव जरी कानावर पडले तरी अंगावर काटा उभा राहतो. प्रत्येकजण या रोगाबद्दल आता जागरुक झाला आहे. जिल्हा रुग्णालयाचा जिल्हा एडस् प्रतिबंधक व नियंत्रण विभाग ठिकठिकाणी जाऊन जनजागृती करीत आहे. त्यामुळे नागरिक जागरुक झाले आहेत. सुरुवातीला काही नागरिक तपासणीसाठी पुढे येत नव्हते. मात्र, त्यांचे समुपदेशन केल्यामुळे आता प्रत्येकजण तपासणीसाठी स्वत:हून पुढे येत आहे. त्यांचे रिपोर्ट गोपनीय ठेवण्याचा विश्वास दिला जातो. तसेच या रोगापासून बचाव करण्यासाठी तसेच रोग जडल्यानंतर घ्यावयाची काळजी, औषधोपचार व उपाययोजना याबद्दल ‘डापकू’कडून मार्गदर्शन केले जात आहे.
यंदाचे घोषवाक्य
‘नो युवर स्टेटस्’
प्रत्येक वर्षी जागतिक एडस् दिनानिमित्ताने एक घोषवाक्य तयार केले जाते.
शून्य गाठायचे आहे, हे घोषवाक्य मागील दोन वर्षांपूर्वी होते.
यावर्षी ‘नो युवर स्टेटस्’ (आपली स्थिती जाणून घ्या) हे घोषवाक्य असून, या माध्यमातून जनजागृती व तपासणी केली जात आहे.
१०९७ टोल फ्री क्रमांक
एचआयव्ही बाधित रुग्ण व याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच समुपदेशन व मार्गदर्शन घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून १०९७ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे. यावरही हजारो नागरिक संपर्क साधून गैरसमज दूर करुन घेत असल्याचे सांगण्यात आले.
दोन सुरक्षा क्लिनिक
जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय येथे सुरक्षा क्लिनिक आहेत. लैंगिक आजाराबद्दल माहिती देऊन मोफत उपचार व समुपदेशन केले जाते.
१७ समुपदेशन केंद्र
जिल्ह्यात १७ ठिकाणी एकात्मिक सल्ला व समुपदेशन केंद्र आहेत. हे केंद्र व प्रशासकीय संस्थेच्या माध्यमातून उसतोड, वीटभट्टी कामगार, वाहनचालक, हॉटेलवरील मजूर, वस्ती, तांडा, आठवडी बाजार, कंपन्या आदी ठिकाणी जाऊन डापकूकडून संबंधितांची तपासणी केली जाते. जनजागृती व समुपदेशनही केले जाते.