जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची परिचारिकेला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 05:11 PM2019-04-18T17:11:15+5:302019-04-18T17:12:14+5:30
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं एक तास काम बंद आंदोलन
बीड : माझ्या आईला सलाईन का लावत नाहीस ? असे म्हणत अधि-परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. सोडवण्यासाठी गेलेल्या परिचारिकेलाही मारहाण झाली. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ८ मध्ये घडली. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ८ मध्ये अनिता रावण कांबळे यांची बुधवारी रात्री ड्युटी होती. त्यांच्याच वार्डमध्ये शेख शमीम नावाची महिला रुग्ण तापेच्या आजारामुळे दोन दिवसांपूर्वी दाखल झाली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास शेख यांचा मुलगा रुग्णालयात आला. माझ्या आईला सलाईन का लावत नाहीस ? असे म्हणत त्याने कांबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी सूचना न दिल्यामुळे मी सलाईन लावू शकत नाही असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपीने कांबळे यांचा हात पकडला. कांबळे यांनी तात्काळ हा प्रकार परिसेविका संगीता दिंडकर यांना कळवला. त्यांनी कर्मचाऱ्यांसह वॉर्डमध्ये धाव घेतली. त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा करताच आरोपीने दिंडकर यांचाही हात पकडून मुरगाळला. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या शारदा गायकवाड यांनाही आरोपीने धक्काबुक्की केली.
रुग्णालयात घडलेला हा प्रकार समजल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी धाव घेताच आरोपीने तिथून पलायन केले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना प्रकार सांगण्यात आला. रात्रीच्या सुमारास त्यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात शेख शमीम यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधि-परिचारिका व परिसेविकेला धक्काबुक्की झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एक तास कामबंद आंदोलन केले. मात्र त्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
डॉक्टर, परिचारिका आपल्याकडे लक्ष देत नाहीत, सलाईन लावत नाहीत, इंजेक्शन देत नाहीत असा गैरसमज रुग्ण व नातेवाईकांमध्ये असतो. मात्र, गरज नसताना असे उपचार करणे धोक्याचे असू शकते. याच गैरसमजुतीतून वाद उद्भवतात. बुधवारचा प्रकारही असाच काहीसा होता. या घटनेमुळे मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.