परिचारिकांनो! तुमच्या सेवाभावाला सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:34 AM2021-05-12T04:34:26+5:302021-05-12T04:34:26+5:30
जागतिक परिचारिका दिवस बीड : कोरोनाची महामारी भयंकर आहे. यात जीव धोक्यात घालून परिचारिका कर्तव बजावत आहेत. प्रत्येक रुग्णाची ...
जागतिक परिचारिका दिवस
बीड : कोरोनाची महामारी भयंकर आहे. यात जीव धोक्यात घालून परिचारिका कर्तव बजावत आहेत. प्रत्येक रुग्णाची कसलाही दुजाभाव न करता शुश्रूषा करत आहेत. सध्या रुग्णांच्या सगळ्यात जवळची नातेवाईक ही परिचारिकाच असून, त्या ‘सिस्टर’ या नात्याने पूर्ण सेवा देत आहेत. मागील वर्षभरापासून या महामारीत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या परिचारिकांच्या कर्तव्याला सर्वच स्तरांतून सलाम केला जात आहे. परिचारिकांनीही आपण हा लढा जिंकूनच दाखवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
१८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे हा जन्मदिवस आहे. तेव्हापासून हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने ‘लोकमत’ने परिचारिकांशी संवाद साधला. त्यांच्या भावना समजून घेतल्या.
छाया बहिरे झाल्या शहिद
या कोरोना लढ्यात रुग्णसेवा करताना छाया बहिरे या परिचारिका शहीद झाल्या होत्या. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी रुग्णसेवा केली होती. यावरून परिचारिका किती जिद्दीने रुग्णसेवा करतात, याचा प्रत्यय येतो. बहिरे यांच्या कुटुंबाला ५० लाखांचा विमा मिळाला असला तरी हे दु:ख पैशात भरून येणारे नसल्याचे त्यांनी व्यक्त केले होते.
वृद्ध परिचारिकांचेही वाॅर्डात कर्तव्य
जिल्हा रुग्णालयात ५० पेक्षा जास्त वय असलेल्या परिचारिकांनीही कर्तव्य बजावले असून, आजही अनेक परिचारिका कर्तव्य बजावत आहेत. नियमित राउंड घेण्यासह नियोजन त्या करत आहेत. अनेकांना कोरोनाची बाधाही झाली; परंतु त्यांनी कोरोनाला लोळवून पुन्हा रुग्णसेवा सुरू केली आहे. त्यांच्या कर्तव्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
काय म्हणतात परिचारिका...
....
कोरोना लढ्यात काम करताना आम्ही सर्व तणावात आहोत. तरीही आमच्या मुली माघार घेत नाहीत. या लढ्यात आमच्या एका परिचारिकेचा जीवही गेला आहे, तर जवळपास ३० पेक्षा जास्त परिचारिकांना कोरोनाची बाधा झाली होती. असे असले तरी आमचे युद्ध अद्यापही सुरूच आहे. हा लढा सर्वांच्या सहकार्याने जिंकून दाखवू. मला माझ्या सर्व परिचारिकांच्या कर्तव्याचा अभिमान आहे.
-संगीता दिंडकर-तावरे, मेट्रन जिल्हा रुग्णालय, बीड
...
पहिल्या लाटेत रात्री २ वाजताही जाऊन कर्तव्य बजावले. रुग्णांचे नातेवाईक कोणीही सोबत नसायचे. यावेळी आम्हालाच त्यांना आधार द्यावा लागत असे. आधारासह उपचारही करावे लागत होते; परंतु आम्ही कधीच याचा कंटाळा केला नाही. रुग्णसेवा हाच आमचा धर्म आहे.
-प्रियांका भोंडवे-कैतके
....
या लढ्यात माझ्यासह कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली होती. यावर मात करून आम्ही सर्व सुखरूप बाहेर आलोत. आता मी पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहे. कोरोनामुक्त होऊन आज अनेक परिचारिका कर्तव्य बजावत आहेत. आम्हाला हा लढा जिंकायचा आहे.
-वंदना उबाळे
...
वर्षभरापासून दिवसरात्र कोरोनात काम करत आहोत. सध्या कामाचा ताणही वाढला आहे. आम्हीसुद्धा तणावात आहोत; परंतु यातून दूर पळून चालणार नाही. आम्हाला सामान्य लोकांचे जीव वाचवायचे आहेत. सर्वच परिचारिकांचे प्रामाणिक कर्तव्य हीच फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना खरी आदरांजली ठरेल.
-राजेंद्र औचरमल, परिचारक