नर्सिंगच्या पीडित विद्यार्थिनीला दाखवली भिती; बीड शहर पोलिसांची होणार चौकशी
By सोमनाथ खताळ | Updated: March 24, 2025 18:49 IST2025-03-24T18:49:16+5:302025-03-24T18:49:59+5:30
बीड शहरात गृह भेटीसाठी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या सहा मुली गेल्या होत्या. त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोन टवाळखोरांनी चिठ्ठी देण्यासह छेड काढली होती.

नर्सिंगच्या पीडित विद्यार्थिनीला दाखवली भिती; बीड शहर पोलिसांची होणार चौकशी
बीड : शहरातील एका नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची दोन टवाळखोरांनी छेड काढली हाेती. याप्रकरणी गुन्हा दाखल करू नये, यासाठी पीडितेसह तिच्या सोबतच्या लोकांना बीड शहर पोलिसांनीच भिती दाखविल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणात पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दखल घेतली असून त्यावेळी हजर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी लावली आहे. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर हे याची चौकशी करणार आहेत.
बीड शहरात गृह भेटीसाठी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या सहा मुली गेल्या होत्या. त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोन टवाळखोरांनी चिठ्ठी देण्यासह छेड काढली होती. याप्रकरणात दोन अनाेळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद झाला. परंतू त्या आधी पीडिता गेल्यावर काही महिला कर्मचारी व पोलिस उपनिरीक्षकांनी पीडितासह तिच्या सोबतच्या लोकांना भिती दाखवली. आरोपी मुलगा त्रास देईल, नंतर कोर्टात चकरा माराव्या लागतील, असे म्हणून त्यांना तेथून काढून देण्याचा प्रयत्न केला. परंतू ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना समजताच त्यांनी ठाण्यात धाव घेतली. त्यांच्याशीही उद्धट वर्तन करण्यात आले. हा प्रकार पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना समजताच बीड शहर ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी लावण्यात आली आहे. सचिन पांडकर यांच्याकडून सोमवारी त्यांची चौकशी करण्यात आली. यासाठी सकाळपासूनच कर्मचारी हे पोलिस अधीक्षक कार्यालयात उभा होते.
कारवाई होणार की पाठिशी घालणार?
या प्रकरणात संबंधित कर्मचारी हे एकमेकांकडे बोट दाखवत होते. शिवाय मी असे केलेच नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. परंतू हा सर्व प्रकार बीड शहर ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता खरोखरच कारवाई होणार की, महिला अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठिशी घालणार? याकडे लक्ष लागले आहे. पांडकर यांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतू ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.