नोटाबंदीमुळे बुडाले ओबीसींचे धंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:11 AM2018-09-30T00:11:44+5:302018-09-30T00:13:34+5:30

नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

OBC business collapses due to non-voting | नोटाबंदीमुळे बुडाले ओबीसींचे धंदे

नोटाबंदीमुळे बुडाले ओबीसींचे धंदे

Next
ठळक मुद्देबीडमध्ये समता मेळावा : छगन भुजबळ यांची सरकारवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सरकारच्या विरोधात बोललं तर दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारखी हत्या केली जाते. मेक इन इंडियाचा बाऊ सरकारने केला आहे. दहशतवाद, काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोदींनी नोटबंदी केली होती. मात्र, यातील एकही गोष्ट साध्य झाली नाही. परंतु नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
बीड येथे शनिवारी झालेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा आयोजित समता मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, खा. समीर भुजबळ, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, आ. सतीश चव्हाण, माजी आ. अमरसिंह पंडीत, आ. रामराव वडकुते, बापूसाहेब भुजबळ, आयोजक सुभाष राऊत, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, उषा दराडे, राजेंद्र जगताप, रवींद्र क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, पार्वती सिरसाट यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, बीडमध्ये आल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पक्ष व पदाचा विचार न करता ते समतेच्या मागे उभे राहिले. ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावत लढलो. याच बीडमधून आपण समता पर्वाची सुरुवात पुन्हा एकदा करीत असल्याचे ते म्हणाले.
जयदत्त क्षीरसागर : पवारांच्या सभेला हजर रहा
भुजबळांच्या नवीन पर्वाचा शुभारंभ बीडपासून होत आहे. त्यांनी संघर्षातूनही आपली वाटचाल सुरुच ठेवली आहे. हा तुरुंगवास हा सहन करावा लागला ? ज्या महाराष्ट्र सदनावरुन भुजबळांना आत जावे लागले त्यामध्ये बसून अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बैठका घेतात. महाराष्ट्र सदन अतिशय सुंदर असल्याच्या वलग्ना देखील त्यांच्याकडून केल्या जातात. मग भुजबळांना ही शिक्षा का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच समाजाला महात्मा फुले यांच्या विचारांची गरज असून, सामान्यांना आधार देण्यासाठी ज्योती-क्रांतीच्या विचाराकडे आपल्याला जावे लागेल असे ते म्हणाले. शरद पवार यांची १ आॅक्टोबर रोजी बीडमध्ये सभा होत आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवारांच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
२०१९ नंतर पुन्हा
निवडणूक होणार नाही- धनंजय मुंडे
मेळाव्यादरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा हे सरकार निवडून आले तर लोकशाहीला घातक आहे.
पुढे निवडणुकाच घेतल्या जाणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
त्यामुळे एकत्रित येऊन या जातीयवादी सरकारविरोधात लढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
शेतकरी अडचणीत
राज्यात शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळाची परिस्थिती असताना देखील तीन हजार भरा, नसता रोहित्र बंद करु असे सांगितले जाते. या दुष्काळाच्या परिस्थितीत पैसे कोठून भरायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अद्यापही निम्म्यापेक्षा जास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. राज्यात ऊसतोड कामगाराच्या मुलीवर बलात्कार होतो. शासनाकडून कठोर कारवाई केली जात नाही. पुढील काळात दुष्काळाचा मुकाबला करावा लागणार आहे. परंतु सरकारकडून मात्र सर्वांच्याच आशेवर पाणी फेरण्याचे काम केले जात असल्याची टीका भुजबळ यांनी केली.
कार्यकर्त्यांचा गोंधळ
मेळाव्याच्या सुरुवातीला प्रमुख नेते व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांच्या एका गटाने जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांनी बॅरीकेटस् तोडले. त्यानंतर क्षीरसागरांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते शांत बसले.

Web Title: OBC business collapses due to non-voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.