'भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर आमच्या बाजूने बोला'; ओबीसी नेते लक्ष्मण हाके थेटच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:17 AM2024-06-28T10:17:54+5:302024-06-28T10:22:04+5:30
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत.
गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काही दिवसापासून ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 'अभिवादन यात्रा' सुरू केली आहे. ही यात्रा बीडमधील भगवान गडावर पोहोचली आहे. यावेळी हाके यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
काही दिवसापूर्वी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा डीएनए ओबीसी असल्याचे भाष्य केले होते. यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, सिंदखेडराजापासून रॅली सुरू झाली आहे. गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत आहे. देवेंद्र फडणवीस जर ओबीसी भाजपचा डीएनए आहे म्हणत आहेत, तर ते बोलत का नाहीत. आम्ही त्यांना वेगळं काही मागत नाही. आमच्या आरक्षणाच्या बाजून फक्त बोला. तुम्ही संविधानीक पदावर आहात, आमच्या हक्क आणि संरक्षणावर बोलो. मराठा आरक्षणाच आलं की म्हणायचे आम्ही तुम्हाला आरक्षण देतो, संवेदनशील काम करतो आणि ओबीसी आरक्षणाचा विषय आला की त्यांना म्हणायचे तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. म्हणजे हे दोन्ही वेळेला कसं होऊ शकतं, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला.
"मराठा समालाजाला ओबीसीतून आरक्षण कसं देणार आहात याच उत्तर आम्हाला पाहिजे आहे. एका बाजूला जरांगे म्हणतात आम्ही ओबीसीमध्ये घुसलोय. तर दुसऱ्या बाजूला सरकार म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. नक्की खरं कोण बोलतंय, ही आमची संभ्रम दूर करा एवढीच आमची मागणी आहे, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
जरांगे पंतप्रधान की राष्ट्रपती?
पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे काय राष्ट्रपती आहेत का देशाचे पंतप्रधान आहेत? जरांगे यांनी काय सभागृहात ठराव घेतला आहे का, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा. मनोज जरांगे नावाचा माणूस बेकायदेशीर घटनाविरोधी आरक्षण मागत आहे. ते कधीही मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्या जीवनात माती कालवण्याचं काम करू नये, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची मिलीभगत आहे, असा गंभीर आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आम्ही अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करण्यासाठी आंदोलन करत आहोत. तानाजी सावंतसारखे मंत्री जरांगेच्या उपोषणाला भेट देतात आणि मी मराठा म्हणून आलो, असे बालिश विधान करतात. आपण १२ करोड जनतेचे मंत्री, मुख्यमंत्री आहोत हे विसरून जातात. शिंदे सरकार ओबीसींना डावलत आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.