सतत चार महिने रात्रंदिवस एक करून मिळवले ओबीसी आरक्षण- शिवराजसिंह चौहान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 07:11 AM2022-06-04T07:11:57+5:302022-06-04T07:12:16+5:30
दु:खाची जाणीव असेल तर मार्ग निघतो
- अनिल लगड
गोपीनाथ गड/परळी (जि.बीड) : कोणी माझ्यासोबत आहे की नाही हे न पाहता मी न्यायालयात गेलो. प्रशासनाला कामाला लावले. माहिती जमा केली. चार महिने रात्रंदिवस एक केला. ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतरच शांत बसलो. ओबीसींच्या दु:खाची जाणीव असेल तर आरक्षणासाठी नक्कीच मार्ग निघतो, असा टोला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात चौहान म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी केली होती. तेवढ्यात ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचे कळले. आम्ही निवडणुका होणार नाहीत, असे जाहीर केले. कोर्टात गेलो. आयोगाला सर्व्हे करण्यास भाग पाडले. रात्रभर आयोगासोबत बैठक घेऊन किती टक्के आरक्षण पाहिजे, यावर विचारविनिमय केला.
मुंडेंनी नवा इतिहास रचला
स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपाला गावोगावी पोहोचविले. मी थकणार नाही, थांबणार नाही, कोणासमोर झुकणार नाही, असे मनाशी ध्येय ठेवून अहोरात्र मेहनत घेतली. राज्यात संघर्ष यात्राद्वारे काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्यास भाग पाडले. सामान्य कुटुंबातील ऊसतोड मजुरांचे प्रश्न सोडविले. मुंडे हे कायम जनतेसाठी जगले ते नवा इतिहास रचून गेले. त्यांना मी कधीही विसरणार नसल्याची भावना चौहान यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांनी घेतले समाधी दर्शन
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन सकाळीच मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. माजी आ. अमरसिंह पंडितसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.