सत्तेसाठी ओबीसींचा वापर झाला : विजय वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:37 AM2021-09-27T04:37:26+5:302021-09-27T04:37:26+5:30
बीड : ओबीसी संख्येने अधिक आहेत, पण ते विखुरलेले आहेत. आता आरक्षण टिकविण्यासाठी एकत्रित यावे लागेल. आतापर्यंत ओबीसींचा केवळ ...
बीड : ओबीसी संख्येने अधिक आहेत, पण ते विखुरलेले आहेत. आता आरक्षण टिकविण्यासाठी एकत्रित यावे लागेल. आतापर्यंत ओबीसींचा केवळ सत्तेसाठी वापर झाल्याचा घणाघात इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. ओबीसींचा सत्तेत सहभाग वाढला तरच समाजाचे प्रश्न सुटतील, असेही त्यांनी सांगितले.
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २६ सप्टेंबरला राष्ट्रीय ओबीसी महासंघ आयोजित जिल्हा अधिवेशन व ओबीसी, व्हीजेएनटी यांच्या आरक्षण बचाव निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. संस्थापक बबनराव तायवाडे, माजी आमदार नारायण मुंडे, शफी अन्सारी, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. पी. टी. चव्हाण, राजेसाहेब देशमुख, विष्णू देवकते, अर्जुन दळे, विष्णू देवकते, संदीप बेदरे, राजुकमार घुले, प्रकाश घुंगरड, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, अनेकजण सत्तेत येण्यासाठी ओबीसींचा आधार घेतात; पण मला आयुष्यात काही स्वत:साठी मिळवायचं नाही. मी आधी सत्तेत आहे आणि या सत्तेचा वापर ओबीसींच्या न्याय हक्कासाठी करीत आहे. ते म्हणाले, १२७ वी घटनादुरुस्ती केली, पण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंतच ठेवली. त्यामुळे ओबीसींमध्ये इतरांना सामावून घेऊन आरक्षण देता येणार नाही. मंडळ आयोग हिंदूविरोधी असल्याचे सांगितले गेले व आपसात लढण्यात वेळ गेला. यातून काय साध्य झाले, वंचित, उपेक्षित घटकांतील लोकांच्या न्याय्य-हक्कांसाठी लढण्यासाठी आपण पहाड बनून उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी अर्जुन दळे यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. पी. टी. चव्हाण, जे. डी. शाह यांची भाषणे झाली. बबनराव तायवाडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. यात त्यांनी ओबीसींच्या न्यायासाठी केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा मांडला. महाज्योती संस्थेमार्फत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेतील बंजारा, वासुदेव, गोसावींनी लक्ष वेधले. ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....
वंचित समाजाला मुख्यमंत्रिपदाची संधी द्या
जे वंचित आहेत, त्यांनाच त्यांच्या वेदना माहीत आहेत. मात्र, सध्या गृहीत धरण्याचे प्रकार सुरू आहेत. तेव्हा ओबीसींना आपली ताकद दाखवावी लागेल. दिल्लीत महिनाभर तळ ठोकून बसण्याची तयारी ठेवावी लागेल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. वंचित समाजातील लोकांना मुख्यमंत्री पदाची संधी का मिळत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
....
मराठा समाजाला विरोध नाही
मराठा आरक्षणप्रश्नी आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये नुकताच मोर्चा काढला होता. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा जाहीर इशारा दिला होता. हा धागा पकडून मंत्री वडेट्टीवारांनी माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. ओबीसींच्या वाट्यातून आरक्षण घेण्याला आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीतून आरक्षणाचा कोटा वाढविण्यासाठी ओबीसी मराठा समाजासोबत राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिवाय कोणी तरी येऊ देत वडेट्टीवारांना म्हटले होते, आता आलो आहे, असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
....