आक्षेप, हरकती, नियमांचा पेच; मुख्याध्यापकांची पदोन्नती रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:00 AM2019-07-02T00:00:48+5:302019-07-02T00:02:13+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापक पदासाठी सोमवारी होणारी पदोन्नती समुदेशन प्रक्रिया रद्द करावी लागली. सायंकाळी याबाबत मुख्य ...
बीड : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापक पदासाठी सोमवारी होणारी पदोन्नती समुदेशन प्रक्रिया रद्द करावी लागली. सायंकाळी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित शिक्षकांना भेटून संवाद साधला. आक्षेप, हरकतींची पडताळणी करुन सुधारित यादीनंतर कदाचित ३ जुलै रोजी पदोन्नती प्रक्रिया होणार आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या ७५ रिक्त जागांवर पदोन्नतीसाठी आक्षेप व हरकती मागवून सुधारित यादी तयार केली होती. त्यानंतर पदोन्नतीची समुपदेशन प्रक्रिया १ जुलै रोजी सकाळी दहा वाजेपासून होणार होती. त्यानुसार स्काऊट भवन परिसरात शिक्षकांची मोठी गर्दी होती. मात्र काही संघटनांनी आक्षेप नोंदविणारी निवेदने दिली होती. समजलेल्या माहितीनुसार १०३४ शिक्षकांची यादी तयार झाली होती. त्यापैकी ज्येष्ठतेनुसार ४०७ शिक्षकांना निश्चित करुन त्यांना १ जुलै रोजी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते.
मात्र उर्वरित काही शिक्षकांनी नाराज होत संघटनांच्या माध्यमातून तर काहींनी वैयक्तिक निवेदने दिली. त्यामुळे पदोन्नती समुपदेशन प्रक्रिया घेण्याबाबत पेच निर्माण झाला होता. तर इकडे स्काऊट भवनमध्ये शिक्षक पदोन्नती समुपदेशनाची प्रतीक्षा करत होते. अखेर सात तासांनंतर ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे शिक्षकांना अधिकृतरित्या सांगण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्काऊट भवनमध्ये शिक्षकांशी संवाद साधला. आक्षेप, हरकती, ज्येष्ठता यादीबाबत निराकरण करुन सुधारित यादी तयार करण्यात येईल. शासन निर्णयानुसार पदोन्नती समुपदेशन प्रक्रिया पार पडणार असल्याचे सांगितले. तसेच २ जुलै रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत आक्षेप, हरकती असल्यास संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात असेही ते म्हणाले.
गटशिक्षण कार्यालयांकडून परिपूर्ण माहिती न आल्याने सेवाज्येष्ठता व इतर मुद्दांचा पेच निर्माण झाला होता. दरम्यान सीईओंच्या निर्णयाचे शिक्षक संघटना समन्वय समितीने स्वागत केले आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक
मुख्याध्यापक पदासाठीची पदोन्नती सुमपदेशन प्रक्रिया रद्द झाल्यानंतर शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड यांनी सर्व गटशिक्षणाधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत सदर प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आल्या.
दिव्यांग संवर्गातील पदोन्नती अनुशेष पूर्ण करण्याची मागणी
दिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींना जिल्हा सेवा वर्ग ३ (क) मधून गट- क मध्ये संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण बहाल केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षक संवर्गातील कर्मचाºयांचा पदोन्नती अनुशेष पूर्ण करताना दिव्यांग प्रवर्गातील शिक्षक कर्मचाºयांना अनुज्ञ आरक्षण देऊन पदोन्नतीची संधी द्यावी असे निवेदन महाराष्टÑ राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक आठवले, जिल्हाध्यक्ष आजिनाथ हाडुळे आदींनी यांनी सीईओंना दिले आहे. तर १ जानेवारी १९९६ पासून पदोन्नतीमधील दिव्यांगांचा अनुशेष पूर्ण करावा अशी मागणी अपंग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे यांनी केली आहे.