शासकीय कामात अडथळा आणला, दोन महिने कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:04 AM2021-02-28T05:04:51+5:302021-02-28T05:04:51+5:30
बीड : ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेत गोंधळ घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बालासाहेब उर्फ बालाजी बाबासाहेब ...
बीड : ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेत गोंधळ घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बालासाहेब उर्फ बालाजी बाबासाहेब जगताप (रा. कळंब आंबा) यास २ महिने कारावासाची शिक्षा व ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. अंबाजोगाई येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या.-१ एस.एस.सापटनेकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
१३ मार्च २०१३ रोजी गावात मासिकसभा सुरु होती. यावेळी जगताप त्याठिकाणी आले व ग्रामपंचायत सदस्यांव्यतिरिक्त इतरांना का बसू दिले, अशी कुरापत काढून, शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच प्रोसेडिंग बुक फाडले, खुर्च्यांची तोडफोड केली होती. याप्रकरणी ऑट्रोसिटी व शासकीय कामात अडथळा आणला या कलमांतर्गंत युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी ए.एम डोंगरे यांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध अंतीम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. प्रकरणाच्या सुनावणीअंती जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या.-१ एस.एस.सापटनेकर यांनी निकाल दिला. जगताप यांना शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ३५३ भादंवि प्रमाणे दोषी धरून दोन महिने कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.याप्रकरणात सहायक सरकारी वकील एल.बी.फड यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली तर, पोह कदम यांनी पैरवीचे कामकाज पाहिले.