इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पालकांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:17+5:302021-07-01T04:23:17+5:30
पुरुषोत्तम करवा/ लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : शहर व तालुक्यात चालत असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पालकांची अडवणूक होताना दिसत ...
पुरुषोत्तम करवा/
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहर व तालुक्यात चालत असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पालकांची अडवणूक होताना दिसत आहे. त्यांच्याकडून गेल्या वर्षीच्या फीसह यावर्षीची फी देखील वसूल करण्यात येत आहे. तरीही याविरोधात कोणीही बोलायला तयार नाही.
गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीच कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे त्यावेळी परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. गेल्या वर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्धी फी पालकांनी भरली होती. यानंतर शाळेत परीक्षाही झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना शासनाने पासदेखील करीत पुढील वर्गात प्रवेश देण्यास सांगितले. गेल्या वर्षी अर्धी राहिलेली फी पालकांनी भरली नव्हती. ती फी भरल्यानंतरच पुढील प्रवेश दिला जात आहे किंवा टी. सी. देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना याच शाळेत प्रवेश घ्यायचा असेल, त्यांनी मागील वर्षीची फी व पुढील वर्षीची फी भरल्याशिवाय त्यांना सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून प्रवेश नाकारला जात आहे. मागील दोन वर्षांत आपले व्यवहार, व्यवसाय म्हणावे तसे न चालल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. असे असताना मात्र इंग्रजी माध्यमांच्या संस्थाचालकांकडून प्रवेशासाठी पालकांकडून अडवणूक केली जात आहे. तरीही शिक्षण संघटनावाले व शिक्षण विभागाचे अधिकारी बोलत नाहीत.
----
पालक सावकाराच्या दारात
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊनमुळे सर्व स्तरातील लोक आर्थिक परिस्थितीने डबघाईला आलेले आहेत. असे असतानाही, शिक्षण क्षेत्रातील लोकांकडून मुलांच्या प्रवेशासाठी अडवणूक केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी, त्यांची फी भरण्यासाठी त्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे.
------
मागील दोन वर्षांची अनेक विद्यार्थ्यांकडे फी बाकी होती. ती आम्ही घेत असून, पुढील वर्षीच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आम्ही सध्या पालक देईल तेवढी रक्कम घेत आहोत.
- आनंद मरळगोईकर, प्राचार्य, इगलवूड इंग्लिश स्कूल, फुलेपिंपळगाव.
------
इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी फी घ्यावी किंवा घेऊ नये, यावर शासनाचे बंधन नसले, तरी शिक्षणाधिकाऱ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ५० टक्के फी आकारून प्रवेश देण्यास सांगितले आहे.
-एल. बी. बेडसकर, गटशिक्षणाधिकारी, माजलगाव