अंगारकीनिमित्त श्री मोरेश्वराच्या दर्शनास रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:16 AM2018-12-26T00:16:55+5:302018-12-26T00:17:05+5:30
श्रीक्षेत्र गंगामसला येथील नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्ता श्री मोरेश्वर (भालचंद्र) च्या दर्शनासाठी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगामसला : श्रीक्षेत्र गंगामसला येथील नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्ता श्री मोरेश्वर (भालचंद्र) च्या दर्शनासाठी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरापासून घाटापर्यंत लांबच लांब रांग लागली होती.
तालुक्यातील गंगामसला येथील श्रीक्षेत्र मोरेश्वर मंदिरात रात्री दोन वाजता श्रींचा महाअभिषेक व महाआरतीनंतर तीन वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्रींचे मंदिर हे गोदावरीच्या ऐन मध्यभागी असून दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला येथे यात्रेचे स्वरूप येते. मंगळवारी अंगारकी चतुर्थी असल्याने बीड, परभणी जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या भाविकांमुळे गंगामसला येथे गर्दी झाली होती.
नवस पूर्ण झालेल्या भाविकांनी पेढे प्रसाद म्हणून वाटले. श्रींच्या दर्शनासाठी महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी गंगामसला येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.