सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:27 AM2018-06-25T00:27:46+5:302018-06-25T00:29:08+5:30
बीड : मुले पळवून नेणारी टोळी बीडमध्ये आली असल्याची अफवा सोशल मीडियावरून दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्यक्षात मात्र असे काहीच नसून ही अफवा असल्याचा खुलासा पोलीस प्रशासनाकडून करण्याबरोबरच त्या थांबवा, असे आवाहन केले जात आहे. अशातच सचिन डोंगरे नामक व्यक्तीने ‘पेठबीड भागात एका व्यक्तीस मुले पळवून घेऊन जाताना रंगेहाथ पकडले’, अशी अफवा पसरविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हेच त्याच्या अंगलट आले असून पेठबीड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अफवा रोखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पाऊले उचलली जात असून बीडमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी खात्री न करता आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करताना विचार करण्याची गरज आहे. मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध अफवा पसरविल्या जात आहेत. यामुळे अनेक निरापराध व्यक्तींना मारहाण होत आहे.
औरंगाबाद, परभणी, जालना येथे मारहाण झाल्यानंतर बीड, परळी व माजलगावमध्ये चोर समजून पाच जणांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी पत्रक काढून या सर्व अफवा असल्याचे सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता संशयीत व्यक्ती आढळल्यास त्याला मारहाण न करता जवळील पोलिसांच्या स्वाधीन करा. कसलीच खात्री न करता एखाद्याला मारहाण होत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे माजलगावमध्ये जवळपास १० लोकांवर गुन्हेही दाखल झाले होते.
एवढे करूनही नागरिकांमध्ये अद्याप पुरेसा बदल झाला नसल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावरून फिरणाºया अफवा काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर या अफवा थांबवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
आतापर्यंत ७ लोकांना मारहाण
माजलगाव, परळी, गेवराई व बीडमध्ये आतापर्यंत ७ निरापराध लोकांना नागरिकांनी चोर समजून मारहाण केली आहे. शुक्रवारी दुपारी मांजरसुंबा येथील एका भंगार वेचणाºया इसमास पेठबीड भागात जबर मारहाण करून पोलीस ठाण्यात आणले. याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाल्याने भीती निर्माण झाली आहे.
गावागावात लावले फलक
या अफवा असून यावर विश्वास ठेवू नका. कोणालाही मारहाण करू नका. संशयितांना पोलिसांच्या ताब्यात द्या अशा सूचना देऊन त्याखाली संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि बीट अंमलदारांचा मोबाईल क्रमांक टाकून गावागावात फलक लावले आहेत. असे असले तरी अफवांना आळा बसेना झाला आहे. तसेच आता गावात जाऊन दवंडीही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुखांनी केले आहे.